खडकवासला येथील बेपत्ता तरुणाचा मृतदेह पानशेत-वेल्हे रस्त्यावरील कादवे खिंडीजवळ आढळला जळालेल्या अवस्थेत
पुणे: खडकवासला येथील कोल्हेवाडी येथून मागील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा मृतदेह अखेर पानशेत -वेल्हे रस्त्यावरील कादवे खिंडीजवळ जळालेल्या अवस्थेत आढळून आला आहे. मागील तीन दिवसांपासून या परिसरात शोधमोहीम सुरू होती, अखेर त्याचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. तन्मय किरण तांबडे (वय 24, रा. सुशिला पार्क, कोल्हेवाडी,खडकवासला) असे मृत तरुणाचे नाव आहे.
दि. 9 मार्च रोजी दुपारच्या सुमारास कामावर जातो असे सांगून तन्मय घरातून गेला तो परत आला नव्हता. नातेवाईकांनी शोधाशोध केली परंतु तो न सापडल्याने अखेर हवेली पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. हवेली पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विलास प्रधान याबाबत तपास करत होते. दि. 11 मार्च रोजी तन्मयची दुचाकी पानशेत-वेल्हे रस्त्यावरील कादवे खिंडीजवळ सुस्थितीत आढळून आली होती. तेव्हापासून हवेली पोलीस व आपत्ती व्यवस्थापन समुहाचे सदस्य परिसरात त्याचा शोध घेत होते.
तीन दिवसांपासून शोधकार्य करुनही काहीच हाती लागले नव्हते. अखेरीस दि. 13 रोजी रात्रीच्या सुमारास दुर्गंधी येत असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन समुहाच्या सदस्यांना मिळाली. त्यानुसार पोलिस हवालदार विलास प्रधान व आपत्ती व्यवस्थापन समुहाच्या सदस्यांनी शोध घेतला असता जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला आहे. तसेच जवळच झाडाला बॅग अडकवलेली दिसून आली आहे. तानाजी भोसले,गणेश सपकाळ,विजय जावळकर,ओम जाधव,स्वप्निल जावळकर,रोहित जाधव संदिप सोळसकर,सदा बनसोडे,आबाजी जाधव, दिलीप तळेकर,वैभव निकाळजे गणेश टिळेकर ,गणेश पांढरे,राहुल पवळे, संजय चोरघे, श्री चौंडे, डॉ तुषार देखणे आदींनी या शोधमोहीमेत महत्वाची भूमिका बजावली. हवेली व वेल्हे पोलीस पुढील कार्यवाही करत आहेत.