वर्क ऑर्डर नाही तरीही खडकवासला-किरकटवाडी शीव रस्त्याच्या भूमिपूजनाची घाई; श्रेयवादासाठी चढाओढ; नागरिक म्हणतात ‘निवडणूक स्टंट’ नको
पुणे: सिंहगड रस्त्याला जोडणाऱ्या खडकवासला व किरकटवाडी या गावांच्या शीव रस्त्याचे आज पुन्हा एकदा भूमिपूजन होत आहे! याच रस्त्याच्या कामाचे हे ‘चौथे भूमिपूजन’ होत असल्याने व श्रेयवादासाठी वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बॅनरबाजी सुरू असल्याने लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा ‘निवडणूक स्टंट’ तर नाही ना असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. कारण अद्याप वर्क ऑर्डरच निघालेली नसल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खडकवासला व किरकटवाडी या गावांच्या शीव रस्त्याचा प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. राजकीय कुरघोड्या, श्रेयवाद, प्रशासनाची उदासिनता आणि स्थानिकांचा विरोध अशा अनेक कारणांमुळे निधी पडून असताना काम सुरू होऊ शकले नाही. याच कारणांमुळे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा तब्बल 87 लाख रुपये निधी परत गेला. सुमारे पंधरा ते वीस हजार लोकसंख्या या एकमेव रस्त्यावर अवलंबून आहे. पावसाळ्यात डोंगरावरुन येणाऱ्या मातीमुळे रस्त्यावरुन चालणे अवघड होते. खराब रस्त्यामुळे या भागातील रहिवाशांना वर्षानुवर्षे मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
आत्तापर्यंत अनेक वेळा या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झालेले आहे मात्र परिस्थिती जैसे थे आहे. आताही पालिकेने निधी मंजूर केला आहे,टेंडर प्रक्रिया झालेली आहे मात्र अद्याप वर्क ऑर्डर निघालेली नाही. अशातच आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पुन्हा एकदा भूमिपूजन होत असल्याने हा निवडणूक स्टंट ठरु नये अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याच्या अगोदरच वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ सुरू असून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे.
“शीव रस्त्याच्या कामाची वर्क ऑर्डर ठेकेदारांना आज पर्यंत दिलेले नाही. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडे संपर्क केला असता स्टँडिंग मान्यता झाल्यावरच वर्क ऑर्डर ठेकेदारांना दिली जाईल, याला थोडा वेळ लागू शकतो असे सांगण्यात येत आहे .असे असताना भूमिपूजन करण्याची घाई का केली जात आहे हा सामान्य नागरिक म्हणून पडलेला प्रश्न आहे.” राजू चौगुले, रस्त्याच्या कामासाठी पाठपुरावा करणारे रहिवासी.
“हे भूमिपूजन कितव्यांदा होतेय हे नेमकं आठवत नाही अशी परिस्थिती आहे. काम सुरू करण्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. पालिकेने हे काम कसे होणार, किती लांब होणार याबाबत फलक लावून जाहीर करणे आवश्यक आहे. केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून स्टंट नको.” अमेय चव्हाण, रहिवासी.
“निधी मंजूर केल्याचे श्रेय घेण्याची राजकीय गडबड सुरू असल्याचे सध्या दिसत आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये मंजूर झालेले काम मार्च 2024 आला तरी अद्याप सुरू झालेले नाही हे वास्तव आहे. तसेच या रस्त्याचे काम सुरू करण्याच्या अगोदर पर्यायी रस्त्याची व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे.” शैलेंद्र मते, रहिवासी.