धक्कादायक.….. गाव गुंडांच्या त्रासामुळे ऐतिहासिक सिंहगड दुरुस्तीचे काम बंद; दुर्गप्रेमी, स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये संताप; लोकप्रतिनिधी शांत का? Sinhagad Fort Work Stopped
धक्कादायक.….. गाव गुंडांच्या त्रासामुळे ऐतिहासिक सिंहगड दुरुस्तीचे काम बंद; दुर्गप्रेमी, स्थानिक नागरिक व पर्यटकांमध्ये संताप; लोकप्रतिनिधी शांत का? Sinhagad Fort Work Stopped
सिंहगड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानाने पावन झालेल्या ऐतिहासिक सिंहगड किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम बंद करण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे हे काम बंद होण्यामागे कोणतेही तांत्रिक कारण नाही तर गाव गुंडांच्या त्रासामुळे काम बंद करण्यात आल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवभक्त, दुर्गप्रेमी, पर्यटक व स्थानिक नागरिक संताप व्यक्त करत आहेत. लोकप्रतिनिधी मात्र याबाबत का शांत आहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सिंहगडाचा कल्याण दरवाजा व आजूबाजूच्या तटबंदीच्या दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाकडून करोडो रुपये निधी मंजूर करण्यात आलेला असून मागील वर्षी या कामाला सुरुवात करण्यात आली होती. ऐतिहासिक स्थापत्य पद्धतीने हे काम करण्यात येणार होते. त्यासाठी आवश्यक पूर्वतयारी पुरातत्व विभाग व संबंधित ठेकेदाराने केली होती. मात्र कामाला सुरुवात झाली नाही तोच काम थांबविण्यात आले होते. मागील अनेक महिन्यांपासून हे काम बंद असल्याने नेमकी अडचण काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली असून गाव गुंडांच्या त्रासाला कंटाळून हे काम बंद करण्यात आले आहे. सिंहगड सारख्या पवित्र ऐतिहासिक ठिकाणी जर गाव गुंड त्रास देत असतील आणि त्यामुळे जर काम बंद पडत असेल तर प्रशासनाने कठोर भूमिका का घेतली नाही? लोकप्रतिनिधी शांत का? अधिकाऱ्यांनी तक्रार का दाखल केली नाही?पोलीस काय करत आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.