
MTDC 50th Anniversary: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा सुवर्णमहोत्सव – 50 वर्षांचा गौरवशाली यशस्वी प्रवास.
पुणे:छत्रपती शिवाजी महाराजांची पावन भूमी असलेल्या महाराष्ट्रात पर्यटनाच्या इतिहासात रोमांचक अध्याय उलगडणारे असे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यशस्वी सेवेची 50 वर्षे पूर्ण करत आहे. यंदाचे वर्ष महामंडळासाठी सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. 1975 साली स्थापन झालेल्या एमटीडीसीने महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी उल्लेखनीय योगदान दिले आहे.
या 50 वर्षांच्या प्रवासात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने राज्यातील विविध नैसर्गिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळांचे संवर्धन आणि प्रचार-प्रसार केला आहे. जागतिक स्तरावर महाराष्ट्राचे पर्यटनस्थळ म्हणून नाव उंचावण्याचे कार्य एमटीडीसीने यशस्वीपणे पार पाडले आहे.
सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून विविध उपक्रम, विशेष कार्यक्रम, प्रदर्शन, आणि पर्यटकांसाठी विशेष योजना राबविण्यात येणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांच्या समृद्धीचा वारसा दाखवणारे उपक्रम, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रचार मोहिमा, स्थानिक समुदायांसोबत भागीदारीतून पर्यटन विकास यांचा समावेश असेल.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकिय संचालक मा. मनोजकुमार सुर्यवंशी म्हणाले, “हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आमच्यासाठी अभिमानाचा आणि नव्या संकल्पांचा काळ आहे. महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.”
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे महाव्यवस्थापक चंदशेखर जयस्वाल यांनी सांगितले, कि “महाराष्ट्र पर्यटनाचा भविष्याचा विकास हे आमचे मुख्य ध्येय आहे. नव्या योजनांद्वारे आम्ही स्थानिक रोजगार निर्माण करणे आणि पर्यटकांना उत्कृष्ट अनुभव देणे यावर भर देणार आहोत.”
सर्वांसाठी पर्यटन अधिक सुलभ, समृद्ध आणि आनंददायक करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सदैव वचनबद्ध आहे.
महाराष्ट्र राज्यातील पर्यटनाला चालना देण्याकरिता तसेच राज्यातील पर्यटन स्थळांना देशांतर्गत – विदेशी पर्यटकांना मोठया प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्रातील साधारणपणे 32 ठिकाणी पर्यटक निवासे चालवित असुन विविध ठिकाणी उपहारगृहांची सोय केलेली आहे. काही ठिकाणी पर्यटक निवासे भाडेपट्टयावर चालविण्यास देण्यात आलेली आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांना महाराष्ट्रातील पर्यटनाचा आयुष्यभरासाठी संस्मरणीय अशा अनुभवात्मक प्रवासात घेऊन जातात.
महाराष्ट्र – निसर्गरम्य सौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचा खजिना असलेल्या महाराष्ट्रात सहा जागतिक वारसा स्थळे, सुमारे 400 किल्ले आणि 900 हून अधिक कोरीव लेणी यामुळे महाराष्ट्र हा निसर्गसौंदर्य आणि सांस्कृतिक समृद्धीचा खजिना बनले आहे. सह्याद्री पर्वतराजीपासून ते गूढ लोणार सरोवरापर्यंत आणि थेट आकाशाला गवसणी घालणाऱ्या कळसूबाई शिखरापासून ते कोकणातील प्राचीन समुद्रकिनाऱ्यांपर्यंत प्रत्येक पर्यटकाला देण्यासाठी राज्याकडे भरपुर सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि निसर्गरम्य ठेवा आहे.
महाराष्ट्रातील अद्वितीय आकर्षण असलेली जागतिक वारसा स्थळे अजिंठा आणि एलोरा लेणी महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक इतिहासाचा पुरावा आहेत, तर कोकणातील गणपतीपुळे आणि तारकर्ली हे समुद्रकिनारे पर्यटकांसाठी लोकप्रिय ठिकाणे बनले आहेत. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आणि विदर्भातील वन्यजीव, नाशिकमधील मंदिरे आणि पुण्यातील सांस्कृतिक वारसा, गड किल्ले ही अद्वितीय आकर्षणे आहेत जी महाराष्ट्राला इतर राज्यांपेक्षा वेगळे करतात.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाराष्ट्रातील पर्यटक निवासांचे जाळे पर्यटकांच्या वाढत्या संख्येची पूर्तता करण्यासाठी तत्पर आहेत. पर्यटकांच्या सेवेसाठी MTDC ने राज्यभर पर्यटक निवासे आणि उपहारगृहांची निर्मिती केली आहे, ज्यात निवास व्यवस्था, खाण – पान, रुचकर भोजन यासारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. छत्रपती संभाजी नगर विभागातील छत्रपती संभाजी नगर, लोणार, अजंठा, फर्दापुर, कोकणातील तारकर्ली, गणपतीपुळे, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, पुणे विभागातील माथेरान, माळशेज घाट, कार्ला, पानशेत, कोयना, महाबळेश्वर, नाशिक विभागातील भंडारदरा, शिर्डी, ग्रेप पार्क, नागपुर विभागातील ताडोबा, पेंच, बोधलकसा, नागपूर, आणि चिखदरा, तसेच मुबईजवळील खारघर, एलिफंटा, टिटवाळा ही पर्यटक निवासे पर्यटकांना अतिउत्तम दर्जाच्या सेवा “अतिथी देवो भव” या भावनेने देत आहेत.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची पर्यटक निवासे अनुभवात्मक पर्यटनाबरोबरच पर्यटकांना आयुष्यभराच्या अनुभवात्मक प्रवासात पर्यटकांचा महाराष्ट्रातील अद्वितीय आकर्षणांचा अनुभव वाढवण्याचे उद्दीष्टे समोर ठेवुन तयार करण्यात आली आहेत. या पर्यटन अद्वितीय आकर्षणांमध्ये कोकणातील अनोखे नयनरम्य समुद्रकिनारे, ताडोबा मधील वन्यजीव, भंडारदरा येथील नैसर्गिक सौंदर्य, पर्वतारोहण, अंतराळ निरीक्षण आणि जंगल सफारीची झलक मिळते. अजंठा आणि वेरूळच्या जागतिक लेण्यांचा नेत्रसुखद अनुभव घेण्यापासुन उल्कापातापासुन तयार झालेल्या लोणार सरोवराचा इतिहासही याची “देही याची डोळा पाहता” येणार आहे. पर्यटकांना पर्यटनाचा आणि पर्यटन स्थळांचा जास्तीत जास्त अनुभव देण्यासाठी महामंडळ गाईडही मागणीनुसार उपलब्ध करुन देत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या महाराष्ट्रातील गडकोट आणि किल्ल्यांचा रोमांचकारी इतिहास पर्यटकांच्या पर्यटनाचा आनंद द्विगुणित करणार आहे.
थरारक जलक्रिडा ते गडकिल्ल्यांची फिरस्ती, गिर्यारोहण करायची इच्छा असो किंवा मुलायम लाटांचा स्पर्श अनुभवायचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सदैव पर्यटकांच्या सेवेत तत्पर आहे.
यानिमित्ताने विविध उपक्रम सर्वच पर्यटक निवासामध्ये राबविण्यात येत असुन पर्यटकांचे पुष्पगुच्छ देवुन स्वागत करण्यात येत आहे.
“महाराष्ट्राच्या पर्यटन स्थळांचे पुनरुज्जीवन करुन राज्याच्या पर्यटन उद्योगाला आवश्यक चालना देणे आणि पर्यटकांना महाराष्ट्राचा गौरवशाली आणि प्राचीन इतिहास, त्यांचा सांस्कृतिक, ऐतिहासिक वारसा आणि राज्याचे अद्भुत निसर्ग सौंदर्य जाणून घेण्याची संधी देण्याबरोबरच महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा जपत, जबाबदार पर्यटनही राबविण्याचे काम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा अविरतपणे करीत असल्याचे प्रतिपादन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी केले आहे.” दिपक हरणे
प्रादेशिक व्यवस्थापक,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ.