तब्बल दहा तोळे दागिन्यांची चोरी…. हवेली पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घ्यायला लावले सहा महिने; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस ने आवाज उठविल्यानंतर वृद्ध दांपत्याची दखल
तब्बल दहा तोळे दागिन्यांची चोरी…. हवेली पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घ्यायला लावले सहा महिने; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस ने आवाज उठविल्यानंतर वृद्ध दांपत्याची दखल
पुणे: ‘सदरक्षणाय खल निग्रहणाय’ असे ब्रीद वाक्य असणाऱ्या पोलीस प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांच्या खूप अपेक्षा असतात. पोलीस आपली कैफियत ऐकून घेतील व न्याय देण्यासाठी मदत करतील अशी भाबडी आशा आयुष्यात पहिल्यांदा पोलीस स्टेशनची पायरी चढलेल्या नागरिकांमध्ये असते. संवेदनशील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी खचलेल्या पिडीताला आधार मिळतो. पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस स्टेशनमध्ये मात्र वृद्ध दांपत्याला अत्यंत वाईट अनुभव आला.
3 जून 2024 रोजी किरकटवाडी येथील शिवनगर भागात राहणाऱ्या श्याम मोरे यांच्या घरातील सुमारे दहा तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले. याबाबत लक्षात आल्यानंतर मोरे यांनी 112 नंबरवर फोन केला. हवेली पोलीस स्टेशन मधील कर्मचारी घरी येऊन पाहणी करून गेले. मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलीस अधिकारी व कर्मचारी गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करु लागले. मोरे पती-पत्नी गुन्हा दाखल करा म्हणत सातत्याने हवेली पोलीस स्टेशनमध्ये हेलपाटे मारत होते मात्र त्यांची तक्रार दाखल करुन घेतली जात नव्हती.
हवेली पोलीस दखल घेत नसल्याने मोरे यांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ शी संपर्क साधून संपूर्ण हकीगत सांगितली. त्यानुसार सविस्तर बातमी करुन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात आले मात्र तरिही असंवेदनशीलतेचा कळस गाठलेल्या हवेली पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घेतला नाही. त्यामुळे द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस ने पुन्हा बातमी करुन पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधून गुन्हा दाखल करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ होत असल्याबाबत निदर्शनास आणून दिले. अखेर चोरीची घटना घडल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी हवेली पोलीस ठाण्यात मोरे यांची तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे.
पोलीसांना इंटरेस्ट असला की अर्जावरुनही कारवाई होते!
ज्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत अशा प्रकरणात पोलिस अत्यंत तत्परता दाखवतात. साधा अर्ज आला तरी त्याची तातडीने दखल घेतली जाते. ठरवून काम घेतले जाते आणि ठरवून तपास अधिकारी नेमला जातो. मात्र ज्या प्रकरणात पैसे मिळणार नाहीत अशा ठिकाणी दुर्लक्ष केले जाते. आम्हाला तेवढंच काम आहे का? आम्ही तेवढ्यासाठीच बसलो आहोत का? आमका बंदोबस्त झाल्यावर बघू, तमक्याचा दौरा झाल्यावर बघू, माझी सुट्टी आहे, साहेब सुट्टीवर आहेत, तुम्हाला काळजी घेता येत नाही का? वगैरे वगैरे उडवाउडवीची उत्तरे सांगून टाळाटाळ केली जाते. न्यायाची अपेक्षा करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनात पोलीस प्रशासनाविषयी नकारात्मक भावना तयार होण्यास याच गोष्टी कारणीभूत आहेत.
तपासाचे काय होणार?
गुन्हा दाखल करुन घेण्यासाठी हवेली पोलीसांनी सहा महिने लावले. त्यामुळे चोरीचा तपास नेमका किती वर्षांनी लागेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान किरकटवाडी, खडकवासला या भागात चोरी, घरफोडीच्या अनेक घटना घडलेल्या असून पोलीस हातावर हात ठेवून बघत आहेत.