व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण आणि निर्घृण हत्येच्या निषेधार्थ तसेच वाढलेल्या गुन्हेगारीच्या विरोधात सिंहगड परिसरातील नागरिकांची जनआक्रोश सभा; वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात नागरिकांचा एल्गार
सिंहगड: खंडणीच्या वादातून व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचे झालेले अपहरण व अत्यंत निर्घृण हत्या करुन मृतदेहाची झालेली विटंबना याच्या निषेधार्थ व सिंहगड परिसरात वाढलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी चर्चा करण्यासाठी जाहिर जनआक्रोश सभेचे आयोजन करण्यात आले आहे. डोणजे येथील ऐतिहासिक अमृतेश्वर मंदिरात रविवार 8 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. ही सभा होणार असल्याचे पत्रकातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. या सभेत सिंहगड परिसरातील गावांतील व वाड्या वस्त्यांवरील नागरिक जमणार असल्याचे ऐकायला मिळत आहे.
14 नोव्हेंबर रोजी पहाटे नामवंत व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचे सिंहगडाच्या पायथ्यापासून अपहरण करुन त्यांची अत्यंत निर्घृण हत्या करुन मृतदेहाचे तुकडे खडकवासला धरणाच्या पाण्यात फेकण्यात आले होते. या घटनेतील मुख्य आरोपी अद्यापही फरार आहे. या घटनेमुळे सिंहगड परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले असून व्यावसायिकही चिंतेत आहेत. दहशतीखाली असलेल्या नागरिकांना कायद्याबाबत विश्वास निर्माण होईल किंवा गुन्हेगारांबद्दलची भिती कमी होईल यासाठी हवेली पोलीसांकडून कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. अवैध धंदेवाले आणि गुन्हेगार यांनी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत अक्षरशः हैदोस घातलेला असताना पोलीस गुन्हा घडण्याची वाट पाहत त्यानंतर ‘चोवीस तासांत आरोपी जेरबंद, बारा तासांत आरोपी जेरबंद’ अशा ‘स्वलिखीत’ हेडलाईन्स देऊन ‘आपल्याच निष्क्रिय हातांनी आपली पाठ थोपटून घेत आहेत.’
सिंहगड परिसरातील संतप्त नागरिकांनी मात्र आता समोर येऊन गुन्हेगारी, दहशत, गुंडगिरी, भाईगिरी,हप्तेवसुली,खंडणी यांचा निषेध करण्यासाठी जाहिर जनआक्रोश सभेचे आयोजन केले आहे. गुन्हेगारीच्या विरोधात तीव्र भावना असलेले तसे पत्रक समाज माध्यमांतून जारी करण्यात आले आहे. जाहिर सभेत आब्रुचे धिंडवडे निघतील म्हणून हवेली पोलीस ही सभा दडपण्याचा प्रयत्न करतात की नागरिकांचा रोष जाणून घेण्यासाठी सभेला उपस्थित राहतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.