
G-20 निमित्त दिखाव्यासाठी खडकवासला धरणामागील रस्त्यावर लावलेले बहुतांश पथदिवे बंद;पुणे मनपाच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष
G-20 निमित्त दिखाव्यासाठी खडकवासला धरणामागील रस्त्यावर लावलेले बहुतांश पथदिवे बंद;पुणे मनपाच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष
खडकवासला: धरणाच्या मागच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेने G-20 परिषदेच्या निमित्ताने बसविण्यात आलेले अनेक पथदिवे बंद स्थितीत आहेत. पालिकेच्या विद्युत विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने रात्रीच्या वेळी रस्त्यावर काळोख राहत असून नागरिकांची गैरसोय होत आहे.
मागील वर्षी G-20 परिषदेच्या निमित्ताने खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला लाखो रुपये खर्च करून पालिकेने पथदिवे बसविले होते. जागोजागी रंगरंगोटी करण्यात आली होती. कोणाचीही मागणी नसताना ही या रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. मात्र सद्यःस्थितीत या पथदिव्यांपैकी बहुतांश पथदिवे बंद स्थितीत असल्याचे दिसत आहे.
पर्यटक, स्थानिक नागरिक, नोकरदार, महिला यांची या रस्त्यावरुन रात्रीच्या वेळी ये-जा सुरू असते. रस्त्यावर अंधार असल्याने व रस्त्याच्या दुतर्फा मोठमोठी झाडे असल्याने असुरक्षित परिस्थितीत नागरिकांना ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे पालिकेच्या विद्युत विभागाने गांभीर्य ओळखून तातडीने पथदिवे दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे.
“अनुचित घटना घडण्याच्या अगोदर पालिकेने लक्ष देणे आवश्यक आहे. किमान आहेत त्या सुविधा तरी व्यवस्थित मिळतील याची काळजी पालिकेने घ्यावी.” सौरभ मते, माजी सरपंच खडकवासला.
“किरकोळ दुरुस्तीकडे पालिका लक्ष देत नसेल तर नवीन कामांची अपेक्षा करणे दूरच आहे. तातडीने दुरुस्ती करुन पथदिवे सुरू करण्यात यावेत.” सुमित शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार खडकवासला विधानसभा मतदारसंघ युवक उपाध्यक्ष.