व्यावसायिक विठ्ठल पोळेकर अपहरण-हत्या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गंभीर दखल; कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांची हवेली पोलीस स्टेशनला भेट
सिंहगड: नामांकित व्यावसायिक विठ्ठल पोळेकर अपहरण आणि निर्घृण हत्या प्रकरणाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतल्याचे दिसत असून कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी हवेली पोलीस स्टेशनमध्ये बसून अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांच्याकडून घटनेबाबत, तपासाबाबत व हवेली पोलीसांच्या भुमिकेबाबत माहिती जाणून घेतली. या प्रकरणातील मुख्य आरोपी व सुत्रधार अद्यापही फरार आहे.
14 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांचे सिंहगड पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी- आतकरवाडी रस्त्यावरून अपहरण करण्यात आले. नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता विठ्ठल पोळेकर यांची अत्यंत निर्घृण हत्या करुन त्यांच्या मृतदेहाचे तुकडे पुणे-पानशेत रस्त्यालगत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ओसाडे(ता. वेल्हे) गावच्या हद्दीत फेकल्याचे समोर आले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(PMRDA)च्या अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन दिवस अथक प्रयत्न करून मृतदेहाचे तुकडे शोधून काढले आहेत.
दरम्यान विठ्ठल पोळेकर यांचे अपहरण व हत्या झाल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. आरोपी आणि विठ्ठल पोळेकर यांच्यात काही दिवसांपूर्वी खंडणीच्या कारणावरुन वादावादी झाल्याचे नातेवाईकांकडून फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच 7 सप्टेंबर रोजी आरोपी आणि पोळेकर यांच्यात विठ्ठल पोळेकर यांच्या घरासमोर तीव्र बाचाबाची झाली होती. त्या घटनेचा व्हिडिओ उपलब्ध आहे. त्या दिवशी पोळेकर कुटुंबातील काही सदस्य तक्रार दाखल करण्यासाठी हवेली पोलीस ठाण्यात गेले होते. पोळेकर यांची फिर्याद टाईपही करुन झाली होती मात्र त्यानंतर काही घडामोडी घडल्या आणि आमची काही तक्रार नाही असे फिर्यादींनी लिहून दिले. त्या दिवशी फिर्यादींवर कोणाचा दबाव होता का?कोणी भीती घातली होती का? आरोपी यापुढे काही करणार नाहीत अशी हमी घेऊन कोणी मध्यस्थी केली होती का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्या दिवशी हवेली पोलीस स्टेशन चे अधिकारी व काही कर्मचारी यांची भूमिका अत्यंत संशयास्पद असून त्याबाबत सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे. हवेली पोलीसांनी या प्रकरणाचे गांभीर्य समजून न घेता हलगर्जीपणा केल्याने यात निरपराध नागरिकाचा निर्घृण खून झाला आहे. विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करतील अशी अपेक्षा आहे.