
……ते निलंबन अखेर रद्द; सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांची येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त पदी नियुक्ती; ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने वास्तव आणले होते समोर
……ते निलंबन अखेर रद्द; सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांची येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त पदी नियुक्ती; ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने वास्तव आणले होते समोर
पुणे: सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे तत्कालीन सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांचे बळीचा बकरा बनवत करण्यात आलेले निलंबन अखेर रद्द करण्यात आले असून त्यांची येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. संदिप खलाटे यांचे निलंबन आणि वास्तव परिस्थिती याबाबत सर्वात आधी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ने वृत्त प्रसिद्ध करुन प्रशासन व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर सर्वच माध्यमांनी संदिप खलाटे यांच्या चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेल्या निलंबनाबाबत आवाज उठविला होता.
दि. 25 जुलै रोजी खडकवासला धरणातून पाटबंधारे विभागाने सुमारे 35 हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार असल्याचे जाहिर करुन प्रत्यक्षात सुमारे 55 ते 60 हजार क्युसेक विसर्ग मुठा नदीच्या पात्रात सोडला. अचानक आलेला पाण्याचा लोंढा आणि जोरदार पाऊस यांमुळे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या एकता नगर व मुठा नदी लगतच्या वसाहतींमध्ये तब्बल पहिल्या मजल्यापर्यंत पाणी शिरले. अशा आपत्कालीन परिस्थितीत सहाय्यक आयुक्त संदिप खलाटे पहाटेपासून पाण्यात शिरुन नागरिकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते.
पूर ओसरल्यावर राजकारणाचा पूर आला. सर्वच राजकीय पक्षांचे नेते, मंत्री या परिसरात भेटीसाठी येऊ लागले. पालिकेचे कर्मचारी, अधिकारी पूरामुळे आलेला गाळ काढण्यासाठी, स्वच्छता करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत होते. असे असताना अचानक कामात हलगर्जीपणा केल्याचा आरोप ठेवून सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. या चुकीच्या निलंबनाबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने सर्वात अगोदर आवाज उठविला.
ज्या पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे पूर आला त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करता पालिकेच्या अधिकाऱ्यांवर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई कशी चुकीची आहे ते द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस ने पुराव्यासह दाखवून दिले. त्यानंतर सर्वच माध्यमांनी या चुकीच्या निलंबनाबाबत टीकेची झोड उठवली. अखेर सदर निलंबन रद्द करण्यात आले असून संदीप खलाटे यांची येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे.