पोलीस निरीक्षकाची तरुणाला पोलीस स्टेशन मध्ये अमानुष मारहाण; तरुणाचा विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न;पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ
पोलीस निरीक्षकाची तरुणाला पोलीस स्टेशन मध्ये अमानुष मारहाण; तरुणाचा विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न;पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ
खडकवासला: हवेली पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण चे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या डोणजे येथील तरुणाला पोलीस ठाण्यात हाताने व पट्टयाने अमानुष मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ माजली आहे. तरुणावर खडकवासला येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
डोणजे येथील रज्जत शेख या तरुणाने आपली आर्थिक फसवणूक झाली असल्याबाबत काही दिवसांपूर्वी हवेली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्याने त्याबाबत अनेक वेळा पाठपुरावा केला परंतु पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही असे तरुणाचे म्हणणे आहे. काल हवेली पोलीस स्टेशन मधील हवालदार संतोष तोडकर यांनी रज्जत शेख याला हवेली पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तक्रार अर्जासंदर्भात बोलवले असावे असे वाटल्याने रज्जत पोलीस स्टेशन मध्ये गेला.
हवेली पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी अगोदर आपल्या कक्षातच रज्जत शेख याला मारहाण केली व त्यानंतर ज्या खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत तेथे नेऊन गिरणीच्या पट्टयाने अमानुष बेदम मारहाण केली. त्याबाबत तरुणाने व्हिडिओ करुन सविस्तर म्हणणे मांडले असून पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांनी मारहाण केली असल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते.धक्कादायक म्हणजे संतप्त तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काल संबंधित तरुणाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
सचिन वांगडे यांची हुकुमशाही!
हवेली पोलीस ठाण्यात मागील काही दिवसांपासून हुकुमशाही पद्धतीने पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांचा कारभार सुरू आहे. 28 ऑक्टोबर रोजी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पुजारी यांच्या समोर पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांनी तक्रारदाराला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे अशा मानसिक संतुलन बिघडलेल्या पोलीस निरीक्षकावर पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
कारवाईस विलंब का?
पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्या काळ्या कारनाम्यांची जंत्री तयार आहे तरीही अद्याप त्यांच्यावर कारवाई न झाल्याने सर्व स्तरांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी याबाबत तातडीने दखल घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे.