खडकवासला धरणामागे तरुण बुडाला; नवरात्रीनिमित्त कपडे धुण्यासाठी जाणे बेतले जीवावर;पुणे मनपा, पीएमआरडीए अग्निशमन दल व हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमने घेतला शोध
खडकवासला धरणामागे तरुण बुडाला; नवरात्रीनिमित्त कपडे धुण्यासाठी जाणे बेतले जीवावर;पुणे मनपा, पीएमआरडीए अग्निशमन दल व हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमने घेतला शोध
खडकवासला: नवरात्रीनिमित्त खडकवासला धरणाच्या मागे कपडे धुण्यासाठी जाणे एका सतरा वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतले आहे. मयुर गणेश नायडू (वय 17, रा. भैरवनाथ नगर, दत्त चौक, कोंढवे धावडे) असे बुडालेल्या तरुणाचे नाव असून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान व हवेली आपत्ती व्यवस्थापन समुहाचे सदस्य यांच्याकडून धरणामागील डोहात मयुरचा शोध घेण्यात आला. धरणामागील पुलावर मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमल्याने वाहतूक कोंडी झाली होती. उत्तमनगर पोलीसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसरत करावी लागली.
आज दुपारी मयुर त्याची आई व इतर नातेवाईकांसह खडकवासला धरणाच्या मागे गोधड्या धुण्यासाठी आला होता. खडकवासला धरणातून मुठा नदीच्या पात्रात विसर्ग सुरू असल्याने पाण्याचा प्रवाह सुरू होता. कपडे धूत असताना मयुरने खडकावरुन डोहात उडी मारली परंतु तो वरच आला नाही. काही क्षणांत मयुर दिसेनासा झाल्याने नातेवाईकांनी आरडाओरड केली. कपडे धुण्यासाठी आलेले इतर नागरिक मदतीसाठी धावले परंतु मयुर सापडला नाही.
याबाबत उत्तमनगर पोलीसांना माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांच्या सूचनेनुसार पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण(PMRDA) व पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलांना पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाचे जवान, हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमचे काही सदस्य डोहात मयुरचा शोध घेत होते परंतु शोध लागत नव्हता. दरम्यान शोध मोहीम सुरू असल्याने पाटबंधारे विभागाने तात्पुरता विसर्ग बंद केला होता. अखेरीस शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर मयुरचा मृतदेह खोल पाण्यात आढळून आला आहे. धरणामागे कपडे धुण्यासाठी गेल्यानंतर नागरिकांनी काळजी घ्यावी, धोकादायक ठिकाणी पाण्यात उतरु नये असे आवाहन उत्तमनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांनी केले आहे.