CCTV VIDEO:हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरांचा धुमाकूळ; डोणजे येथे शेजाऱ्यांच्या घरांना कड्या लावून दरोड्याचा प्रयत्न; मुलं अभ्यास करत असल्याने डाव फसला
सिंहगड: हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांपासून चोरांनी धुमाकूळ घातला असून नागरिक, व्यावसायिक हैराण झाले आहेत. सातत्याने घरफोड्या होत असल्याने हवेली पोलीसांच्या रात्र गस्तीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे.
डोणजे येथील मस्जिद जवळ राहण्यासाठी असलेल्या राजेश कांबळे यांच्या घरावर दरोडा टाकण्याचा प्रयत्न मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला. मुलं अभ्यास करत असल्याने घराबाहेर सुरू असलेली संशयास्पद हालचाल त्यांच्या लक्षात आली. परिसरातील नागरिकांना याची माहिती त्यांनी फोन करुन दिली. धक्कादायक म्हणजे दरोडेखोरांनी नियोजित कट आखला होता व कांबळे यांच्या घरालगतच्या घरांना बाहेरुन कड्या लावल्या होत्या.
कांबळे यांनी फोन करुन परिसरात माहिती दिल्यानंतर दरोडेखोर पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. त्यांच्या हातामध्ये कटावणी सदृश वस्तू असल्याचे व्हिडिओतून दिसून येत आहे. सुदैवाने मुलं अभ्यास करत असल्याने दरोड्याचा प्रयत्न फसला व अंधाराचा फायदा घेऊन दरोडेखोर पसार झाल्याचे दिसत आहेत. किरकटवाडी, खडकवासला व आता डोणजे परिसरात अशा घटना सातत्याने घडत असल्याने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करत आहेत. ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने हवेली पोलिसांच्या दिखाऊ रात्र गस्तीबाबत मागील काही दिवसांपूर्वीच वृत्त प्रसिद्ध केले होते.