एका बाजूला शासन लोकाभिमुख होत असल्याचे दावे केले जात असताना हवेली पोलीस ठाण्यात मात्र ‘हुकुमशाही’ सुरू असल्याचा प्रत्यय
पुणे: शासकीय कामकाज पारदर्शी व लोकाभिमुख व्हावे म्हणून राज्य व केंद्र शासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केले जात असताना पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस ठाण्यात मात्र हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. नागरिक, पत्रकार किंवा इतर कोणालाही कसलीही माहिती पोलीस कर्मचाऱ्यांनी द्यायची नाही असा तुघलकी फतवा हवेली पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी काढला आहे.
एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याबाबत अधिकृत माहिती घेण्यासाठी हवेली पोलीस ठाण्याच्या लॅंडलाइन नंबरवर फोन केला असता आम्ही माहिती देऊ शकत नाहीत, असे उत्तर ऐकायला मिळते. माहिती घेण्यासाठी पोलीस निरीक्षकांच्या दुरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तोही फोन लागत नाही. यापूर्वी असा अनुभव कधीही आलेला नसून पोलिस ठाण्यात संपर्क केला असता ठाणे अंमलदार अधिकृत माहिती देत असे. सध्या मात्र सर्व कारभार हुकुमशाही पद्धतीने सुरू असल्याचे दिसत असून कर्मचाऱ्यांना पोलीस निरीक्षक थेट कारवाईच्या धमक्या देत आहेत.
वास्तव झाकलं जावं म्हणून?
घटना जशी घडली आहे त्याप्रमाणे बातमी केली, त्यामागची कारणं मांडली तर पोलीसांना तडजोड करण्यासाठी किंवा ‘तोडीकर’ण्याची संधी मिळत नसल्याचे ऐकायला मिळत आहे. याचा थेट परिणाम ‘धंद्यावर’ होत असल्याने पत्रकांना गुन्ह्यांची माहितीच मिळू नये यासाठी असे अघोरी प्रयत्न केले जात आहेत का अशी शंका निर्माण होत आहे. जाणीवपूर्वक वास्तव झाकण्यासाठी आणि खरी माहिती समोर येऊ नये म्हणून ही उठाठेव सुरू असल्याचे जाणवत आहे.
कोंबडं झाकलं म्हणून सुर्य उगवायचा थांबतो का?
‘हवेली पोलीस व पत्रकार संघ’ अशा नावाचा एक व्हॉट्स ॲप गृप आहे ज्यावर पूर्वी गुन्ह्यांची माहिती व बातम्यांची आदानप्रदान होत असायची. या गृपवर अनेक वरिष्ठ अधिकारी, बदलून गेलेले अधिकारी कर्मचारी, पत्रकार यांचा समावेश होता. सध्याचे पोलीस निरीक्षक आल्यापासून गृपवर गुन्ह्यांची माहिती देण्याची परंपरा बंद करण्यात आली. सत्य लपविण्यासाठी व आपल्याला हवी तशी बातमी यावी म्हणून जे मर्जीतील आहेत त्यांनाच माहिती कळवायची अशी नवीन प्रथा सुरू झाली. धक्कादायक म्हणजे गृपर येत असलेल्या वास्तव बातम्या पाहावत नसल्याने जुन्या गृपमधून काहींना टाळून दुसरा गृप बनविण्यात आला. आता हव्या तशा बातम्यांची मैफिल त्या गृपवर सुरू राहिल! पण प्रश्न असा आहे खरी बातमी करणाऱ्या पत्रकारांपासू माहिती लपवली म्हणजे ती माहिती बाहेर पडणारच नाही हा गोड गैरसमज अधिकाऱ्यांचा झाला असावा. कारण कोंबडं झाकून ठेवलं म्हणून सुर्य उगवायचा कधीही थांबलेला नाही!
विश्वासामुळे सर्वसामान्य नागरिकच देतात माहिती!
चोरी, अपघात, घरफोडी, हाणामारी किंवा इतर गुन्ह्यांची माहिती ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या विश्वासामुळे सर्वसामान्य नागरिक तातडीने कळवतात. माहिती देणाराचे नाव कधीही उघड केले जात नाही किंवा तडजोड केली जात नाही याची खात्री असल्याने सर्वसामान्य नागरिक ही ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ खरी ताकद बनली आहे. त्यामुळे रात्री अपरात्री घडलेल्या घटनांची माहितीही ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’कडे सर्वात अगोदर पोचलेली असते. पत्रकारितेत स्त्रोत जपनं खुप महत्वाचं असतं आणि ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ या तत्वाचे तंतोतंत पालन करत असल्याने वाचकांना वेगवान, वस्तुनिष्ठ व वास्तव बातम्या वाचण्यास मिळतात. गृप बदलले, माहिती लपवली, जाणीवपूर्वक दिली नाही तरी काहीही फरक पडणार नाही. वाचकांचा विश्वास जपण्यासाठी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ नेहमीच तत्पर असणार आहे.