अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने जपली सामाजिक बांधिलकी; आदिवासी कातकरी कुटुंबांना किराणा मालाचे वाटप
पुणे: आंबेगाव येथील अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने सामाजिक बांधिलकी जपत खडकवासला, एनडीए गेट व गोऱ्हे बुद्रुक येथील तेवीस आदिवासी कातकरी कुटुंबांना किराणा मालाच्या किटचे वाटप करण्यात कूले. भावी शिक्षकांमध्ये सामाजिक संवेदना जागृती व्हावी व दुर्लक्षित समाजघटकांची परिस्थिती प्रत्यक्ष अनुभवायला मिळावी म्हणून ‘आऊटरिच’ या उपक्रमांतर्गत ही मदत देण्यात आली. यावेळी आदिवासींच्या झोपडीतील दारिद्र्य पाहून विद्यार्थी शिक्षकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले होते.
अभिनव शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ कांचन चौधरी यांनी आदिवासी कातकरी कुटुंबांना शक्य ती मदत करण्याची संकल्पना आजी-माजी विद्यार्थ्यांपुढे मांडली. प्राचार्यांनी केलेल्या आवाहनाला सर्व शिक्षक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मदत जमा केली. महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक डॉ अमोल चव्हाण व विद्यार्थी शिक्षक द्विवेश वाडेकर यांनी जमा झालेल्या मदतीतून खडकवासला येथील आठ, एनडीए गेट येथील दहा व गोऱ्हे बुद्रुक येथे पाच अशा एकूण तेवीस कुटुंबांसाठी किराणा मालाचे किट तयार केले व लहान मुलांसाठी खाऊची व्यवस्था केली.
प्राध्यापक डॉ अमोल चव्हाण, मिनल सोनुकले व वर्षा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील चाळीस विद्यार्थी-शिक्षकांनी आदिवासी कातकरी कुटुंबांना दुर्गम ठिकाणी जाऊन या मदतीचे वाटप केले. यावेळी भावी शिक्षिकांनी कातकरी महिला, पुरुष व चिमुकल्यांशी संवाद साधला. मोडक्यातोडक्या कुडाच्या झोपड्या, अस्ताव्यस्त पडलेले भांडे, फाटलेले कपडे, मातीवर लोळणारे चिमुकले पाहून अनेक विद्यार्थ्यांनींच्या डोळ्यात पाणी आलेले दिसत होते.
समाजातील अशा खऱ्या गरजूंना यापुढेही शक्य ती मदत करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. सदर उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल संस्थेच्या समन्वयक सविता शिंदे यांनी सर्वांचे कौतुक केले. समाजोपयोगी उपक्रम राबवून संस्थेचा नावलौकिक वाढविल्याबद्दल अभिनव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजीव जगताप, सचिव सुनिता जगताप यांनी उपक्रमात सहभागी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व प्राचार्यांचे अभिनंदन केले.