साहेब या फटीत कॉंक्रीट नाही तर किमान डांबर तरी भरा; NWA जवळील काम सुरू असलेल्या ठिकाणी अनेक दुचाकीस्वार जखमी; माती निघून गेल्याने वाहने घसरुन होताहेत अपघात
साहेब या फटीत कॉंक्रीट नाही तर किमान डांबर तरी भरा; NWA जवळील काम सुरू असलेल्या ठिकाणी अनेक दुचाकीस्वार जखमी; माती निघून गेल्याने वाहने घसरुन होताहेत अपघात
सिंहगड रोड: सिंहगड रस्त्यावरील National Water Academy(NWA) समोर केंद्र शासनाच्या ‘VVIP अधिकारी व कर्मचाऱ्यांना’ ये-जा करण्यासाठी करोडो रुपये खर्चून सुरू असलेल्या अंडरपास च्या कामामुळे सदर ठिकाणी वाहतुक वळविण्यात आलेली आहे. मात्र वाहतूक वळविलेल्या दोन ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणा व अर्धवट कामामुळे सर्वसामान्य नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक दुचाकीस्वार या ठिकाणी जखमी झाले आहेत.
वाहतूक वळविण्यासाठी सदर दोन ठिकाणी असलेले दुभाजक काढण्यात आले आहेत. वाहनांची संख्या जास्त असल्याने त्या दुभाजकाच्या जागेत असलेली माती निघून जात असून खड्डा तयार झाला आहे. दोन्ही बाजूंना कॉंक्रीटच्या कडा आणि मधे मोठी फट यामुळे त्यात दुचाकीचे चाक गेल्यानंतर तोल जात आहे.
मागील काही दिवसांपासून येथे अनेक दुचाकी घसरून अपघात झाल्याने नागरिक जखमी झाले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी किमान डांबर भरुन रस्ता व्यवस्थित करुन घेणे आवश्यक आहे. तात्पुरती माती किंवा मुरुम भरुन काहीही उपयोग होत नाही. सदर काम पुढे अनेक दिवस चालणार असल्याने सदर दोन्ही ठिकाणी डांबरीकरण करुन रस्ता समतल करुन घेणे आवश्यक आहे.