PMC work: पालिकेचे अधिकारी-ठेकेदार गायब; वाहतूक कोंडीने रहिवाशांचे हाल; खडकवासला-किरकटवाडी शीव रस्त्याचे काम पुन्हा थांबल्याने नागरिक संतप्त
पालिकेचे अधिकारी-ठेकेदार गायब; वाहतूक कोंडीने रहिवाशांचे हाल; खडकवासला-किरकटवाडी शीव रस्त्याचे काम पुन्हा थांबल्याने नागरिक संतप्त
खडकवासला: खडकवासला व किरकटवाडी या गावांच्या शीव रस्त्याचे काम पुन्हा थांबल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. अर्धवट खोदून ठेवलेल्या रस्त्यामुळे अगोदरच अरुंद असलेला रस्ता आणखी अरुंद झाला असून एकाच बाजूने वाहतूक सुरू असल्याने मोठी वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत.
पालिकेने सुमारे दोनशे कोटी रुपये निधी शीव रस्त्याच्या कामासाठी मंजूर केलेला असून मोठ्या प्रतिक्षेनंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. वर्षानुवर्षे या भागातील रहिवासी खराब रस्त्यामुळे वैतागलेले असल्यामुळे काम सुरू झाल्यानंतर लवकरच दिलासा मिळेल असे सर्वांना वाटले होते. परंतु केवळ काही फूट लांब काम संबंधित ठेकेदाराने केले असून त्यातीलही दुसऱ्या बाजूचे काम अर्धवट आहे.
दहा ते पंधरा हजार लोकसंख्या या एकमेव रस्त्यावर अवलंबून असल्याने आणि काम सुरू करताना पर्यायी रस्त्याची व्यवस्था पालिकेने न केल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. दररोज होणाऱ्या या वाहतूक कोंडीमुळे विद्यार्थी, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक, महिला, व्यावसायिक अशा सर्वांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. केवळ पाच ते दहा टक्के काम करेपर्यंत ही परिस्थिती झालेली असल्याने पूर्ण काम होईपर्यंत काय परिस्थिती असेल याची कल्पनाही न केलेली बरी. पालिकेच्या पथ विभागाचे अधिकारी या कामाबाबत अजिबात गंभीर नसून ठेकेदाराकडून वेळेत काम करुन घेण्यात ते असमर्थ ठरत आहेत.