Sinhagad Fort:मॅरेथॉन की ‘गल्लाथॉन’? आयोजकांचा ‘धंदा’ आणि स्थानिकांच्या पोटावर पाय! ‘व्यावसायिक संस्थेला’ पोलीस आणि जिल्हा प्रशासनाची ‘सरकारी परवानगी!!’
सिंहगड: रानमेवा, चहा, दही, पिठलं भाकरी, भजी विक्रेते, प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक ते हॉटेल चालक अशा हजारो स्थानिकांचा रोजगार अवलंबून असणाऱ्या आणि दररोज हजारो दुर्गप्रेमी,पर्यटकांनी गजबजत असलेल्या सिंहगडाच्या घाट रस्त्यावर एका खाजगी व्यावसायिक संस्थेच्या ‘हितासाठी’ पोलीस व जिल्हा प्रशासन मेहेरबान झाले असून आज दि. 14 व उद्या दि 15 डिसेंबर रोजी घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे स्थानिकांसह पर्यटक, दुर्गप्रेमी संताप व्यक्त करत असून व्यापारी तत्त्वावर स्पर्धा आयोजित केलेली असताना इतरांना वेठीस धरण्याची गरज काय असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या अहवालानुसार पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवस सिंहगड घाट रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. अनेकांना या आदेशाची माहिती नसल्याने व ऐन सुट्टीच्या दिवशी वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने अनेक पर्यटक, दुर्गप्रेमींना परत फिरावे लागत आहे. शनिवारी व रविवारी मिळून सुमारे दोन ते तीन लाख रुपये उपद्रव शुल्क वन विभागाच्या तपासणी नाक्यावर जमा होत असते तेही नुकसान केवळ एका व्यावसायिक संस्थेच्या ‘हितासाठी’ होणार आहे.
या स्पर्धेचे वेगवेगळे टप्पे असून त्यात सहभागी होण्यासाठी प्रत्येकी 4 ते 6 हजार रुपये नोंदणी शुल्क ठेवण्यात आलेले आहे. या स्पर्धेत सुमारे 400 स्पर्धक सहभागी होणार आहेत असा अहवाल खुद्द पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ सुहास दिवसे यांना पाठवला आहे. त्या आधारावर जिल्हाधिकाऱ्यांनी तत्परतेने आदेश जारी करुन दोन दिवस सिंहगड घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत. मागील काही काळापासून वन विभाग, पोलीस प्रशासन आणि जिल्हा प्रशासन अशा व्यापारी स्पर्धांच्या आयोजकांना पायघड्या घालताना दिसत आहे. कदाचित पाकीटाच्या मोहापायी तर हे सुरु नाही ना अशी शंका नागरिकांकडून उपस्थित केली जात आहे. यापुढे अशा व्यापारी स्पर्धा सिंहगडासारख्या पवित्र ठिकाणी लादताना प्रशासनाने विचार करुन निर्णय घ्यायला हवा.