दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी घेतले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानच्या गणेशाचे दर्शन; नाम फाऊंडेशनच्या कामाचे केले कौतुक
सिंहगड: उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या डोणजे येथील निवासस्थानी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. दोघांनीही यावेळी अभिनेते नाना पाटेकर यांच्या सोबत महाप्रसादाचा लाभ घेतला. अनौपचारिक चर्चेदरम्यान दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांनी नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून राज्यभर सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामाचे कौतुक केले.
आज दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस हे दोघेही अभिनेते नाना पाटेकर यांच्या डोणजे गावच्या हद्दीतील पायगुडेवाडी येथील निवासस्थानी गणेशाच्या दर्शनासाठी दाखल झाले होते. गणपतीची आरती झाल्यानंतर अभिनेते नाना पाटेकर यांच्या आग्रहाखातर उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांनी सोबत महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी वेगवेगळ्या विषयांवर अनौपचारिक गप्पा रंगलेल्या दिसल्या.
राज्यभरात नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असून पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठीही मदत होत आहे असे गौरवोद्गार दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी काढले. येत्या 21 सप्टेंबर रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे नाम फाऊंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण अभिनेते नाना पाटेकर यांनी यावेळी दोघांना दिले असता त्याचा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी स्विकार करत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.