सिंहगड रस्त्यावरील नवनिर्मित उड्डाणपूलाला सुभेदार नरवीर तानाजी मालुसरेंचे नाव द्या; शिवसेना विभागप्रमुख महेश पोकळेंची पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी
पुणे: सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम सध्या वेगाने सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होऊन उड्डाणपूल नागरिकांसाठी उपलब्ध होईल असे चित्र दिसत आहे. दरम्यान सिंहगड रस्ता, सिंहगड किल्ला व परिसराचा ऐतिहासिक वारसा लक्षात घेता या नवीन उड्डाण पूलाला सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघ विभागप्रमुख महेश पोकळे यांनी पालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
” राजाराम पूल ते फन टाईम दरम्यान उड्डाणपूल उभारण्यात आलेला असून लवकरच नागरिकांसाठी तो खुला करण्यात येईल. सदर उड्डाणपूलास अद्याप पर्यंत कोणतेही नाव देण्यात आलेले नाही. या उड्डाणपूलास नरवीर तानाजी मालुसरेंचे नाव देण्यात यावे अशी मागणी या पत्राद्वारे करीत आहोत.
शालेय पुस्तकातून तसेच सिनेमाच्या माध्यमातून पुण्यातील सिंहगड किल्ल्याचा इतिहास परिचित होत असतो. सिंहगडाची लढाई ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील महत्त्वाच्या घटनांपैकी एक घटना आहे. मुघलांशी तहात गमावलेले किल्ले परत घेण्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी मोहिमा आखल्या होत्या. त्या योजनेतच सिंहगड परत मिळवणे अतिशय महत्त्वाचे होते.
सिंहगडावर झालेली ही लढाई नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बलिदानासाठी ओळखली जाते. नरवीर तानाजी मालुसरे हे शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सुभेदार व छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी होते. नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वराज्य स्थापनेपासूनच अनेक महत्त्वाच्या घडामोडीत सहभाग घेतला होता.
नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास पुढील काळात येणाऱ्या पिढीलाही माहिती होण्यासाठी राजाराम पूल ते फन टाईम दरम्यान उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलास नरवीर तानाजी मालुसरे उड्डाणपूल हे नाव देण्यात यावे ही विनंती,” असे पोकळे यांनी पालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.