Traffic News:खडकवासला-किरकटवाडी शीव रस्त्याच्या खोदकामाचा फटका; वाहतूक कोंडीने नागरिक हैराण; पालिका-पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष
खडकवासला: अनेक वर्षांपासून रखडलेल्या खडकवासला व किरकटवाडी या गावांच्या शीव रस्त्याचे काम पालिका प्रशासनाने सुरू केले खरे परंतु नियोजनाअभावी नागरिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. शीव रस्त्याच्या खोदकामामुळे मुख्य सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागत असून पालिका आणि पोलीस प्रशासन मात्र कोठेही दिसत नाही.
अगोदरच अरुंद असलेला शीवरस्ता अर्धा खोदल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरू आहे. पर्यायी रस्ता नसल्याने याच खोदलेल्या रस्त्याच्या कडेने वाहतूक सुरू आहे. खोदकामही इतके खोल करण्यात आले आहे की एखाद्या वाहनचालकाचा तोल गेल्यास मोठा अपघात होऊ शकतो. लोकवस्ती जास्त असल्याने सकाळी व संध्याकाळी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यावर वाहतूक कोंडी होते व त्याचा परिणाम मुख्य सिंहगड रस्त्यावरील वाहतूकीवर होताना दिसत आहे.
सीडब्ल्यूपीआरएस गेट समोर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागत आहेत. वाहतूक सुरळीत करण्यासाठी सकाळ संध्याकाळ वाहतूक पोलीस तैनात असणे आवश्यक आहे मात्र तशी कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. तसेच पालिका प्रशासनानेही रस्त्याच्या खोदकामामुळे वाहतुकीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. पावसाळा तोंडावर आलेला असताना करण्यात आलेले हे खोदकाम आणि कासवालाही लाजवेल अशा गतीने सुरू असलेले काम हे नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.