सिंहगड परिसरातील कष्टकरी महिलांचा सन्मान;मावळा जवान संघटनेचा उपक्रम
पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त सिंहगड परिसरातील कष्टकरी, कर्तृत्ववान तसेच वयोवृद्ध महिलांचा पानशेत रस्त्यावरील निगडे मोसे येथील छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज समुह शिल्प सृष्टीत मावळा जवान संघटनेच्या वतीने साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला.या अनोख्या सन्मानाने कष्टकरी महिला भारावून गेल्या होत्या.माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ प्रतिमेचे पूजन करुन सोहळ्यास प्रारंभ झाला.
सिंहगड, पानशेत,सोनापुर , मालखेड ओसाडे आदी भागातील महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला. बाल व्याख्याती स्वप्निका भोसले हिने व्याख्यानातुन जिजाऊ, सावित्रीबाई फुले व कर्तबगार महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव केला.
त्याग व संस्कारातुन महिला केवळ आपले कुटुंबच नव्हे तर समाज घडविण्यासाठी योगदान देत आहेत असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता इंगळे यांनी केले. माजी नगरसेवक हरिदास चरवड म्हणाले, वयोवृद्ध महिलांची संख्या कमी होत आहे तसतसे कुटुंबातील अंतर वाढत चालले आहे. ज्याच्या घरात वयोवृद्ध आजी आजोबा आहेत ती कुटूंबे भाग्यवान आहेत.
प्रास्ताविक इतिहास अभ्यासक दत्ताजी नलावडे यांनी केले.सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष लहु निवंगुणे,हवेली तालुका देख रेख संघाचे संचालक लक्ष्मण माताळे, भाजपा दिव्यांग आघाडी पुणे जिल्हाध्यक्ष बाजीराव पारगे, उद्योजक बंडु नलावडे, निगडेच्या सरपंच सुनिता नलावडे, ओसाडेच्या सरपंच सुरेखा पिलाणे, सचिन सुर्वे, ॲड. विक्रम भोसले, सचिन पवळे आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन सचिन पिलाणे यांनी केले.