राष्ट्रीय जल अकादमी जवळ कार दुभाजकावर आदळून अपघात; दोघेजण थोडक्यात बचावले
पुणे: रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील राष्ट्रीय जल अकादमी (NWA) जवळ कार दुभाजकावर आदळून भीषण अपघात झाला. सुदैवाने कारमधील दोघेजण या अपघातात थोडक्यात बचावले असून कारच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या दोघांना विशाल बधे व इतर नागरिकांनी सुखरुप बाहेर काढले.
रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट डीझायर कारमधून दोघेजण किरकटवाडी येथे चालले होते. राष्ट्रीय जल अकादमी जवळ चालकाचे नियंत्रण सुटले व कार दुभाजकावर आदळून फीरली. कारचा वेग इतका होता की दुभाजकावर नुकत्याच लावण्यात आलेल्या पथदिव्याच्या खांबाचे अक्षरशः तुकडे झाले आहेत.
जखमींना बाहेर काढल्यानंतर नागरिकांनी कारही रस्त्यातून बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली आहे. तसेच रस्त्यात पडलेला खांब कडेला घेण्यात आला आहे.