Khadakwasla assembly: भाजप च्या पहिल्या यादीत खडकवासल्याचे नाव नसल्याने चर्चांना उधाण;खरंच तसं होणार?
खडकवासला: विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आघाडी घेत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी जाहीर केलेल्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 99 उमदेवारांचा समावेश आहे. पहिली यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मागील तीन निवडणुकांपासून भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात मात्र चर्चांना उधाण आले आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाच्या काही माजी नगरसेवकांनी वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन खडकवासला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची मागणी केली होती. तत्पूर्वी खडकवासला विधानसभा मतदारसंघातील उमेदवार यावेळी बदलणार असल्याची चर्चा सुरू झालेली होती. त्यामुळे पक्षातील पदाधिकाऱ्यांचा विरोध आणि लोकसभा निवडणुकीत बदललेले मतांचे गणित यामुळे यावेळी उमेदवार बदलेल या चर्चांनी जोर धरलेला आहे.
त्यातच आज प्रसिद्ध झालेल्या पहिल्या यादीत खडकवासला विधानसभा मतदारसंघातील उमदवाराचे नाव नसल्याने खरच ती चर्चा खरी ठरणार का? याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अर्ज भरण्याची तारीख जवळ आल्याने लवकरच याबाबत काय घडतेय ते पाहायला मिळणार आहे. मात्र पहिल्या यादीत नाव नसल्याने चर्चांना उधाण आले आहे.