NAAM Foundation:’गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत हवेली-मुळशीतील जलसाठ्यांनी घेतला मोकळा श्वास;नाम फाऊंडेशन, जलसंपदा विभाग आणि लोकसहभागातून काम; लाखो लिटर जलसाठा वाढला
पुणे: ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ या योजनेंतर्गत हवेली व मुळशी तालुक्यातील गावांतील अनेक लहानमोठ्या तलावांतील वर्षानुवर्षे साचलेला गाळ काढल्याने या धरणांनी मोकळा श्वास घेतला आहे. तसेच लाखो लिटर जलसाठा वाढल्याने त्याचा फायदा पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी होणार आहे. नाम फाऊंडेशन, जलसंपदा विभाग व लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला आहे.
भुगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जलाशय, चोंदे दरा पाझर तलाव, भूकूम येथील खाटपेवाडी पाझर तलाव तसेच हवेली तालुक्यातील कल्याण, मालखेड, गोऱ्हे खुर्द, खानापूर, मनेरवाडी येथील तलावांतील गाळही काढण्यात आला आहे. भुगाव-भूकूम येथील तलावांतून तब्बल पाच हजार हायवा भरून गाळ काढण्यात आल्याने तेथील जलसाठा लाखो लिटरने वाढला आहे.
नाम फाऊंडेशन, पुणे जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंता सुजाता हांडे, खडकवासला पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता श्वेता कुऱ्हाडे, बांधकाम व्यावसायिक, दानशूर नागरिक अशा सर्वांच्या सहकार्याने हे गाळ काढण्याचे काम करण्यात आले. पुढील हंगामातही जिल्ह्यातील आवश्यक असलेल्या धरणे व पाझर तलावांतील गाळ काढण्याचे काम करण्यात येणार असल्याची माहिती नाम फाऊंडेशन कडून देण्यात आली आहे.