
Khanapur Citizens Reaction:नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा;महिलांनी निर्भीडपणे सांगितल्या व्यथा; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासमोर निघाले हवेली पोलीसांच्या आब्रुचे धिंडवडे
Khanapur Citizens reaction:नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा;महिलांनी निर्भीडपणे सांगितल्या व्यथा; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासमोर निघाले हवेली पोलीसांच्या आब्रुचे धिंडवडे
खानापूर: 1 जुलै रोजी सायंकाळी खानापूर व परिसरातील नागरिकांनी दारु, गांजा व इतर अवैध धंदे, वाढलेली गुन्हेगारी, हवेली पोलीसांचा असंवेदनशीलपणा इत्यादींबाबत निर्भीडपणे संताप व्यक्त करत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासमोर आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अक्षरशः हवेली पोलीसांच्या आब्रुचे धिंडवडे काढले. याबाबत सध्या परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. दरम्यान रुपाली चाकणकर यांनीही पोलीस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले असल्याचे सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी खानापूर येथे सराईत गुन्हेगारांनी हातात पिस्तूल, कोयते घेऊन घरात घुसून तोडफोड केली होती. महिलेच्या डोक्याला पिस्तूल लावून दहशत निर्माण केली होती. तसेच मोठ्या प्रमाणात वाहनांची तोडफोड केली होती. धक्कादायक म्हणजे ही घटना घडली तेव्हा हवेली पोलीस खानापूर परिसरातच होते. ही घटना घडल्यानंतर सर्व ग्रामस्थ एकवटले व एकत्रित बैठक घेऊन झालेल्या घटनेचा तीव्र निषेध करत कठोर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा सुरू केला. गावातील काही पदाधिकाऱ्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना याबाबत लक्ष घालण्याची विनंती केली होती.
नागरिकांच्या तक्रारी,व्यथा समजून घेण्यासाठी रुपाली चाकणकर 1 जुलै रोजी सायंकाळी खानापूर येथे आल्या होत्या. परिसरातील महिला व पुरुष या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. परिसरातील दारु,गांजा व इतर अवैध धंदे बंद व्हायला पाहिजेत याकडे नागरिकांनी लक्ष वेधले. तीन वेळा तक्रार द्यायला गेले परंतु हवेली पोलीसांनी लक्ष दिले नाही. ज्यांच्या विरोधात तक्रार देणार ते म्हणतात आम्ही पोलीसांना मॅनेज केले आहे, असे म्हणत एका महिलेने तीव्र संताप व्यक्त केला. सर्व नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले व तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. निर्ढावलेले पोलीस अधिकारी आता नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतात की फक्त मान डोलवून ऐकलेले सोडून देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
निष्क्रिय तपास पथक आणि गोपनीय अंमलदार
खानापूर येथे सातत्याने गुन्हेगारी घटना घडत आहेत. परिसरात अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. गुन्हेगारी टोळ्या सक्रिय आहेत. सराईत गुन्हेगार गावठी कट्टे घेऊन गावात तोडफोड करतात, दहशत निर्माण करतात मग याची माहिती तपास पथकाला का मिळत नाही? गोपनीय अंमलदार काय करत असतो? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हद्दीत कायदा व सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले असताना सत्कार करुन घ्यायचा की आत्मक्लेश करायचा याचे आत्मचिंतन तपास पथक आणि गोपनीय अंमलदाराने करायला हवे.