
कोथरुड डेपोतील वाहकाचा प्रामाणिकपणा;महिलेची एक तोळ्याची चैन केली परत; गहिवरलेल्या महिलेने दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्तपणे डेपोत येऊन केला वाहकाचा सन्मान
कोथरुड डेपोतील वाहकाचा प्रामाणिकपणा;महिलेची एक तोळ्याची चैन केली परत; गहिवरलेल्या महिलेने दुसऱ्या दिवशी उत्स्फूर्तपणे डेपोत येऊन केला वाहकाचा सन्मान
पुणे: PMPML ची कोथरुड डेपो ते अप्पर ही बस नेहमीप्रमाणे 20 जून रोजी प्रवासी वाहतूक करुन डेपोत परत आली. सर्व प्रवासी उतरुन गेल्यानंतर वाहक लहू हगवणे(रा. किरकटवाडी, सिंहगड रोड) यांनी बसमध्ये फेरफटका मारला. मागच्या सिटवर त्यांना सोन्याची चैन पडलेली दिसून आली. लहू हगवणे यांनी ती चैन उचलली व आपल्या सहकाऱ्यांना त्याबाबत माहिती दिली.
दरम्यान डेपोमध्ये हिशोब देऊन इतर नियमित कामे करत असताना जराशी घाबरलेली महिला डेपोमध्ये आली. डेपो परिसरात ती काहीतरी शोधत असल्याचे लहू हगवणे यांनी पाहिले व काय हरवले आहे का?असे विचारले. तेव्हा पाणावलेल्या डोळ्यांनी ती महिला म्हणाली एक तोळ्याची सोन्याची चैन हरवली आहे पण नेमकी कुठे पडली की काय झाले आठवत नाही. शेतकरी कुटुंबातील कष्टाळू व प्रामाणिक असलेल्या वाहक लहू हगवणे यांनी महिलेला धीर दिला व घाबरु नका तुमची चैन गाडीत मला मिळून आलेली आहे असे सांगितले. लहू हगवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमक्ष त्या महिलेचा ऐवज तिला परत केला. दुःखात आलेली महिला आनंदीत होऊन निघून गेली.
दुसऱ्या दिवशी ती महिला पुन्हा कोथरूड डेपोत आली व ते कालचे वाहक कुठे आहेत विचारु लागली. सहकाऱ्यांनी लहू हगवणे यांना बोलावून घेतले. महिलेने लहू हगवणे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल उत्स्फूर्तपणे त्यांना टी शर्ट व पत्नीसाठी साडी देऊन सन्मान केला. यावेळी इंटक युनियनचे सरचिटणीस आनपूर साहेब, कोथरुड डेपोचे नियंत्रक भिमसिंग शिंदे व नवले साहेब आदी उपस्थित होते.