
Murder Case:पानशेत येथे आदिवासी कातकरी तरुणाची हत्या; वेल्हे पोलीसांनी ॲट्रॉसिटीचे कलम लावलेच नाही
Murder Case:पानशेत येथे आदिवासी कातकरी तरुणाची हत्या; वेल्हे पोलीसांनी ॲट्रॉसिटीचे कलम लावलेच नाही
पानशेत: पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीत पानशेत येथे आदिवासी कातकरी समाजातील तरुणाची पाच जणांनी निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे. धक्कादायक म्हणजे मृत तरुण आदिवासी कातकरी समाजातील आहे हे माहित असताना वेल्हे पोलीसांनी ॲट्रॉसिटीचे कलम लावले नसल्याचे समोर आले आहे. रोहिदास काळुराम काटकर (वय 24 रा . कादवे ता वेल्हे/राजगड जि पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.
15 जून रोजी पानशेत येथे रोहिदास काटकर या आदिवासी कातकरी तरुणाची किरकोळ कारणावरून पाच जणांनी निर्घृण हत्या केली होती. याप्रकरणी आकाश सुभाष भिसे (वय 21, रा.चारभुजा रेसिडेन्सी, वाल्हेकर चौक, नऱ्हे), भागवत मुंजाजी आसुरी (वय 20 रा. कानडे हाईट्स, सिद्धी चौक, नऱ्हे), रितेश उत्तम जोगदंड (वय 21, रा ज्ञानेश्वर पार्क,नऱ्हे), उमेश उर्फ भैय्या रामभाऊ शेळके , पांडुरंग भानुदास सोनवणे (वय 19, रा चारभुजा रेसिडेन्सी, नऱ्हे) यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1), 3(5), 189(2), 191(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे ग्रामीण पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
मयत रोहिदास काटकर हा अतिमागास असलेल्या आदिवासी कातकरी समाजातील असल्याने व पोलीसांना त्याबाबत माहिती असल्याने अनुसूचित जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे(ॲट्रॉसिटीचे)कलम लावून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करणे आवश्यक होते मात्र याप्रकरणी वेल्हे पोलीसांनी ॲट्रॉसिटीचे कलम लावलेले नाही. वेल्हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी संबंधित कलम लावले नसल्याचे सांगितले आहे. याप्रकरणी ॲट्रॉसिटीचे कलम लावून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होईल यासाठी पोलिसांनी एफ आय आर मध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे.
अगोदरच परिस्थिती बिकट
हवेली व वेल्हे तालुक्यात सिंहगड व पानशेत परिसरातील गावांमध्ये आदिवासी कातकरी समाजातील नागरिकांच्या लहानमोठ्या वस्त्या आहेत. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हा समाज जीवन जगत आहे. राहणीमान अत्यंत साधे आहे. साधेपणा व दुर्बलतेचा गैरफायदा घेऊन आरोपींनी जाणीवपूर्वक झुंडशाही करत रोहिदास काटकर याच्यावर जीवघेणा हल्ला केला असावा त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचण्यासाठी व आदिवासी कातकरी समाजावरील अन्याय अत्याचार थांबविण्यासाठी आरोपींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक त्या ठिकाणी ॲट्रॉसिटी कायद्याची पोलीसांनी संवेदनशीलपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.