
किरकटवाडी फाटा ते नांदोशी रस्त्याची दुरवस्था; पहिल्याच पावसात जागोजागी खड्डे; पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल; तातडीने दुरुस्तीची मागणी
किरकटवाडी फाटा ते नांदोशी रस्त्याची दुरवस्था; पहिल्याच पावसात जागोजागी खड्डे; पालिकेच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे हाल; तातडीने दुरुस्तीची मागणी
किरकटवाडी: पहिल्याच पावसात किरकटवाडी फाटा ते नांदोशी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून किरकटवाडी, नादोशी, सणसनगर येथील नागरिक हैराण झाले आहेत. पालिकेच्या संबंधित विभागांनी पावसाळ्यापूर्वी आवश्यक कामे न करुन घेतल्याने नागरिकांना हाल सहन करावे लागत आहेत. परिणामी नागरिक पालिकेच्या विरोधात संताप व्यक्त करत आहेत.
किरकटवाडी फाट्यापासून किरकटवाडी गावठाणापर्यंत जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनांचे चाक त्यात जाऊन पायी चालणाऱ्यांच्या अंगावर घाण उडत आहे. किरकटवाडी- नांदोशी रस्त्यावरही तीच परिस्थिती आहे. नांदोशी गावात तर चिखल गाळामुळे पायी चालणे अवघड झाले आहे. काही ठिकाणी पालिकेच्या पथ विभागाने केलेले निकृष्ट काम अवघ्या काही दिवसांत उखडले आहे. अजून तर पावसाळ्याला सुरुवात व्हायची आहे तोच अशी वाईट परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत. पालिकेने तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
किरकटवाडी फाटा येथे धोकादायक खड्डा
किरकटवाडी फाट्यावर मुख्य सिंहगड रस्त्याला लागून पावसाळी वाहिनीच्या तोंडाला धोकादायक खड्डा आहे. या पावसाळी वाहीनीत राडारोडा अडकल्याने ती वाहीनी तुंबत आहे. पाऊस सुरू असताना तेथे पाणी भरत असल्याने वाहनचालकांना अंदाज येत नाही. परिणामी अनेक दुचाकी व चारचाकी वाहने या खड्डयात अडकून अपघात होत आहेत. तसेच त्यामुळे शनिवारी व रविवारी वाहतूक कोंडीत भर पडते. पालिकेच्या संबंधित विभागांनी याबाबत तातडीने कार्यवाही करण्याची गरज आहे.