
धक्कादायक….खून करुन आरोपी आला थेट पोलिस स्टेशनमध्ये; महिलेच्या खूनप्रकरणी आरोपीवर नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
धक्कादायक….खून करुन आरोपी आला थेट पोलिस स्टेशनमध्ये; महिलेच्या खूनप्रकरणी आरोपीवर नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
पुणे: उसणे दिलेल्या पैशांवरुन धायरी येथे महिलेचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्यामली कमलेश सरकार (वय 40, रा फ्लॅट नं 302, सुर्य उज्वल हाईट्स, जाधवनगर रायकर मळा, धायरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी नितीन चंद्रकांत पंडित (वय 51, रा. फ्लॅट नं 306, निसर्ग हाईट्स, शेवटच्या बस स्टॉपजवळ, धायरी)याला अटक करण्यात आली आहे.
फिर्यादीवरून मिळालेल्या माहितीनुसार रिक्षाचालक असलेल्या आरोपी नितीन पंडित याने मयत महिलेच्या पतीला पन्नास हजार रुपये हात उसणे दिले होते. आरोपी ते पैसे मागण्यासाठी सातत्याने सरकार यांच्या घरी जात होता. चार जून रोजी आरोपी नितीन पंडित पैसे मागण्यासाठी गेला असता श्यामली सरकार आणि त्याच्यात वाद झाला. त्यातून आरोपीने श्यामली सरकार यांचा ओढणीने गळा आवळून खून केला व हातपाय बांधून तोंडाला चिकटपट्टी लावली. धक्कादायक म्हणजे आरोपीने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन खून केल्याची माहिती दिली.
याबाबत माहिती मिळताच झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत गायकवाड, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल यादव, कल्याणी कासोदे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी नितीन पंडित याला अटक करण्यात आली असून नांदेड सिटी पोलीस पुढील तपास करत आहेत.