
आगळंबे गावच्या हद्दीत खडकवासला धरणात भराव टाकून बड्या अधिकाऱ्याने उभारलेय आलिशान फार्महाऊस; पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष
पुणे: आगळांबे(ता.हवेली) गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भराव टाकून एका बड्या अधिकाऱ्याने आलिशान फार्महाऊस बांधले आहे. इतर ठिकाणी अतिक्रमणाची पुंगी वाजवत फिरणारे पाटबंधारे विभागाचे अधिकारी याठिकाणी मात्र गप्प असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
खडकवासला, पानशेत, वरसगाव या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात डॅम व्ह्यू असलेल्या जागा खरेदी करुन थेट पाण्यापर्यंत ताबा मारण्याचे पेव सध्या फुटलेले आहे. यामध्ये वेगवेगळ्या शासकीय विभागांतील अधिकारी आघाडीवर असून काही स्थानिक एजंट हाताशी धरून त्यांचा हा गोरखधंदा सुरू आहे. धक्कादायक म्हणजे गप्प असलेला पाटबंधारे विभाग एकप्रकारे यांना छुपा पाठिंबा देतोय असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही.
आगळंबे गावच्या हद्दीत अशाच एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने राजरोसपणे खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात भराव टाकून टोलेजंग फार्महाऊस बांधले आहे. काही वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिक्रमण केलेल्या अनेक बांधकामांना नोटिसा दिलेल्या आहेत मात्र पुढे काहीही कारवाई झालेली नाही. हा अधिकारी आपल्या पदाचा वापर करुन पाटबंधारे विभागाचे तोंड दाबतोय का हाही प्रश्न उपस्थित होत आहे. सर्वसामान्य नागरिकांवर कारवाई करताना कायद्यावर बोट ठेवणारा पाटबंधारे विभाग येथे मात्र खडकवासला धरणाच्या पाण्यासारखा थंडगार पडत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अधिकारी याकडे लक्ष देऊन कारवाई करतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.