
MPDA Action: सराईत गुन्हेगार MPDA कायद्यानुसार स्थानबद्ध; नांदेड सिटी पोलीसांची 4 थी कारवाई
MPDA Action: सराईत गुन्हेगार MPDA कायद्यानुसार स्थानबद्ध; नांदेड सिटी पोलीसांची 4 थी कारवाई
पुणे: नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या निर्मीतीपासून हद्दीतील सराईत गुन्हेगारांवर सातत्याने प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत. नुकतीच सराईत गुन्हेगार साजन विनोद शहा (वय 19, रा. पोकळे क्रिस्टल, धायरी) याच्यावर MPDA कायद्यानुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. पुढील वर्षभरासाठी त्याला जालना येथील कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जारी केले आहेत.
साजन शहा याच्यावर बेकायदा घातक अग्निशस्त्र जवळ बाळगणे, मारामारी, दहशत माजविणे, चोरी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सातत्याने प्रतिबंधात्मक कारवाया करुनही त्याच्यात सुधारणा होत नव्हती. त्याची परिसरात दहशत होती त्यामुळे नागरिक तक्रार करण्यास समोर तेत नव्हते. साजन शहा हा आणखी गंभीर गुन्हे करण्याची शक्यता लक्षात घेऊन नांदेड सिटी पोलीसांनी त्याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई केली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या सूचनेनुसार नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हिलान्स पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम, पोलीस अंमलदार प्रथमेश गुरव यांनी सदर प्रस्ताव तयार केला होता. हद्दीतील गुन्हेगारी घटना व गुन्हेगार यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी यापुढेही अशा कारवाया सातत्याने करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे.