
IMPACT: खडकवासला येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे पोलीस ॲक्शन मोडवर; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उपाययोजनांसंदर्भात पाहणी; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या बातमीची दखल
IMPACT: खडकवासला येथील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे पोलीस ॲक्शन मोडवर; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उपाययोजनांसंदर्भात पाहणी; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ च्या बातमीची दखल
(निलेश बोरुडे: संपादक -द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)
खडकवासला: द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने सडेतोड बातमी करुन लक्ष वेधल्यानंतर खडकवासला धरण चौपाटी परिसरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे शहर पोलीस ॲक्शन मोडवर आले असून आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी खडकवासला धरण चौक, चौपाटी व डीआयएटी गेट परिसरात आवश्यक उपाययोजना करण्यासाठी पाहणी केली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
रविवारी खडकवासला धरण परिसरात सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. प्रशासनाचे कोणतेही नियोजन नसल्याने बेशिस्त पर्यटकांनी रस्त्यावर अस्ताव्यस्त वाहने उभी केली होती. तसेच दुचाकी व चारचाकी वाहनचालक वाहतुकीचे नियम न पाळता अरेरावी करत मधे वाहनं घालून वाहतूक कोंडीत भर घालत होते.
द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने याबाबत बातमी करुन पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, वाहतूक विभागाचे उपायुक्त अमोल झेंडे यांचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज स्वारगेट वाहतूक विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख, नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, नांदेड सिटी वाहतूक विभागाचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय निकुंभ, सिंहगड रोड वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार बरडे यांनी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यासंदर्भात पाहणी केली. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेच्या वतीने वाहतूक नियोजन करण्यासंदर्भात पोलीसांना निवेदन देण्यात आले.

अधिक पोलीस बंदोबस्त असणे गरजेचे
खडकवासला धरण चौपाटी, खडकवासला धरण चौक, खडकवासला बाह्यवळण रस्ता, कोल्हेवाडी फाटा, किरकटवाडी फाटा, नांदेड फाटा व नांदेड सिटी गेट या ठिकाणी शनिवार व रविवारी अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात असणे आवश्यक आहे. पोलीस उपस्थित नसल्याने किरकोळ कारणांवरून वाहतूक कोंडीला सुरुवात होते जी पुढे आवाक्याच्या बाहेर जाते. शनिवारी व रविवारी असणारी वाहनांची संख्या आणि उपलब्ध रस्ता हे प्रमाण अत्यंत असमतोल आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अधिकचा पोलीस बंदोबस्त तैनात असणे आवश्यक आहे. तसेच बेशिस्त वाहणचालकांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे.