
पहिल्यांदा कोर्टात आलात काय? वकिलाच्या अपघाती मृत्यू प्रकरणात आरोपीला वाचविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन न जाता गेलेल्या हवेली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कोर्टाने झापले; नवीन पोलीस अधिक्षकांनी लक्ष घालण्याची गरज
पहिल्यांदा कोर्टात आलात काय? वकिलाच्या अपघाती मृत्यू प्रकरणात आरोपीला वाचविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे घेऊन न जाता गेलेल्या हवेली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना कोर्टाने झापले; नवीन पोलीस अधिक्षकांनी लक्ष घालण्याची गरज
(निलेश बोरुडे: संपादक -द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)
पुणे: मनमानी कारभार करण्यात सराईत असलेल्या हवेली पोलीसांना पुणे-पानशेत रस्त्यावरील मनेरवाडी गावच्या हद्दीत झालेल्या ॲड अनिकेत अरुण भालेराव (वय 35 रा.वरदाडे) यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणात पहिल्यांदाच कोर्टात आला आहात काय? असे म्हणत कोर्टाने झापले असून फिर्यादींच्या वकीलांनी केलेली मागणी ग्राह्य धरत गंभीर कलम लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलिसांनी कागदपत्रे सादर केली व आरोपी राज संतोष चोरघे (वय 24, रा.कोंढवा बुद्रुक) यास कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी हवेली पोलीसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप वकिलांनी केला आहे. पुणे ग्रामीणचे नवीन पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.
विरुध्द दिशेने भरधाव फॉर्च्युनर कार चालवत दुचाकीस्वार वकीलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या राज संतोष चोरघे (वय 24, रा. कोंढवा बुद्रुक) याला शुक्रवारी (दि. 16) न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीने गंभीर गुन्हा केलेला असतानाही पोलिसांनी त्याविरोधात जामीनपात्र कलम लावल्याने पुणे बार असोसिएशनने तक्रार अर्ज करत त्यास विरोध केला. अखेर, आरोपीविरोधात अजामीनपात्र कलम लावल्यानंतर न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
अनिकेत अरुण भालेराव (35, रा. वरदाडे, ता. हवेली, जि. पुणे) असे अपघाती मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी, शांताराम गोपाळ भालेराव यांनी हवेली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना बुधवारी (दि. 14) संध्याकाळी साडेचारच्या सुमारास पुणे-पानशेत रस्त्यावरील मनेरवाडी येथे तारांगण हॉटेलसमोर घडली. भाजीपाला आणण्यासाठी खानापूर येथे अनिकेत आले असता विरुध्द दिशेने आलेल्या फॉर्च्युनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये ते गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले. त्यानंतर, याप्रकरणात आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे अॅड. दिलीप गायकवाड, पुणे बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष अॅड. हेमंत झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष अॅड. समीर भुंडे, सचिव भाग्यश्री मुळे-गुजर, फिर्यादीच्या वतीने अॅड. प्रकाश चव्हाण, अॅड. श्रीकांत थोरात यांनी काम पाहिले.
“विरुध्द दिशेने गेल्यास अपघात होऊ शकतो याची कल्पना आरोपीला होती. विरुध्द दिशेने जात असताना भरधाव गेल्यास अपघात होऊन एखादी व्यक्ती मयत होऊ शकते याची माहितीही त्याला होती. अपघात झाल्यानंतर आरोपी तसाच निघून गेला. गंभीररित्या जखमी झालेल्या अनिकेत यांना वेळीच मदत झाली असती तर त्यांचा जीव वाचला असता. पोर्शे प्रकरणानंतर पोलिसांना जाग आलेली नाही. अजूनही संवेदनशुन्य परिस्थिती कायम आहे. आरोपीला वाचवायच्या भूमिकेतच पोलीस असल्याचे दिसून येत आहे.” अॅड. श्रीकांत थोरात, फिर्यादीचे वकील.
“सहा वाजता न्यायालयाची सुट्टी होत असते. मात्र, ही घटना संवेदनशील होती. तसेच, पोलिसांनी सुरवातीला अदखलपात्र कलमे लावून आरोपीला न्यायालयात हजर केले. यावेळी, त्यांनी आरोपीच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली. वकिलांनी दखलपात्र कलम लावण्यात यावे म्हणून न्यायालयाकडे अर्ज दाखल केला. त्या अर्जावर दोन्ही बाजूची सुनावणी होऊन दखलपात्र कलम न्यायालयाकडून लावण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी करणारी कागदपत्रे सादर केली व रविवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली.यासर्वांसाठी वेळ गेल्याने रात्री आठ वाजेपर्यंत प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एल. के. सपकाळ यांचे न्यायालय सुरू होते” अॅड. भाग्यश्री गुजर-मुळे, सचिव, पुणे बार असोसिएशन
तपास अधिकार्याची भूमिका संशयास्पद
तपास अधिकार्याची भूमिका संशयास्पद आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचे कलम लावणे आवश्यक होते. मयताच्या मित्रांनी लक्षात आणून देऊनही हे कलम लावण्यात आले नाही. आरोपी सोबत स्टेशन डायरी आणली नाही. बाजू मांडण्यासाठी सरकारी वकिलांना रिमांड रिपोर्ट दिला नाही. यावरून तपास अधिकारी आरोपीची कशी सुटका होईल, हे पाहत आहे. या पार्श्वभूमीवर तपास अधिकारी बदलावा, अशा मागणीचे पत्र फिर्यादींनी हवेली पोलीस स्टेशनला दिले आहे.
वर्षभरापूर्वी असाच प्रकार!
7 एप्रिल 2024 रोजी हवेली पोलीस स्टेशन हद्दीत गोऱ्हे बुद्रुक येथील पेट्रोल पंपासमोर भरधाव स्कॉर्पिओने दिलेल्या धडकेत गणेश रामचंद्र जावळकर यांचा मृत्यू झाला होता तर पत्नी गंभीर जखमी झाली होती. त्यावेळी चालक हा मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत होता. निष्पाप नागरिकाचा जीव गेलेला असताना असंवेदनशील असलेल्या हवेली पोलीसांची त्याच रात्री तडजोडीसाठी धावपळ सुरू होती. ही बाब वरिष्ठांपर्यंत गेली आणि यात हवेली पोलीस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
पोलीस निरीक्षक जबाबदार नाही का?
आरोपीला न्यायालयात हजर करण्यासाठी घेऊन जाताना तपास अधिकारी आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन जात आहेत की नाहीत, गुन्ह्याच्या स्वरुपानुसार आवश्यक कलमे लावलेली आहेत की नाहीत, तपास अधिकारी आरोपीला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत का अशा सर्व बाबींची पडताळणी करण्याची जबाबदारी पोलीस निरिक्षकांची नाही का? याचा अर्थ पोलीस निरिक्षकांना जबाबदारीचे भान नाही की ते जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहेत याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने दखल घेणे आवश्यक आहे. नवीन पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल हे यात नक्कीच लक्ष घालतील अशी अपेक्षा आहे.