
खडकवासला ते नांदेड फाटा दरम्यान सिंहगड रस्त्यालगत पालिकेकडून पुन्हा खोदकाम; वाहतुकीस अडथळा;पायी चालणारांना धोका
खडकवासला ते नांदेड फाटा दरम्यान सिंहगड रस्त्यालगत पालिकेकडून पुन्हा खोदकाम; वाहतुकीस अडथळा;पायी चालणारांना धोका
खडकवासला: मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असलेल्या व त्या तुलनेत अपुरी रुंदी असलेल्या सिंहगड रस्त्यालगत खडकवासला ते नांदेड फाटा दरम्यान पुणे मनपाकडून केबल टाकण्यासाठी जागोजागी खोदकाम करण्यात आल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. बस थांब्यावर उभं राहण्यासाठी सुद्धा या खोदकामामुळे जागा राहिली नसल्याचे नागरिकांना धोकादायकपणे मुख्य रस्त्यावर बसची वाट पाहत उभं राहावं लागत आहे. या खोदकामाच्या कडेने सुरक्षेसंदर्भात कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.
काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेने पथदिवे बसविण्यासाठी पालिकेने खोदकाम केले होते. आता पुन्हा पालिकेने खोदकाम सुरू केले असून हे खोदकाम कडेने न करता मुख्य रस्त्यालगत करण्यात आले आहे. मुख्य रस्त्यापासून दहा ते वीस फूट जागा शिल्लक असताना खोदकाम मुख्य रस्त्यालगत करण्यात आले असून त्यातील माती मुख्य रस्त्यावर टाकण्यात आली आहे.
खोदकामातून निघलेली माती रस्त्यावर टाकण्यात येत असल्याने अगोदरच अरुंद असलेला रस्ता आणखी चार ते पाच फूट कमी झाला आहे. त्यामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण झाला असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तसेच पुणे शहर वाहतूक पोलीसांनी संबंधित ठेकेदाराला याबाबत उपाययोजना करण्यासाठी सूचना करणे आवश्यक आहे. तसेच अपघात होऊन निष्पाप नागरिकाचा जीव गेल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा अगोदरच संबंधित ठेकेदार, मनपा अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करणे आवश्यक आहे.