
Jwellers Robbery Case: म्हणून मालक चोरांच्या मागे पळाला नाही; धायरी येथे भरदिवसा सोनाराच्या दुकानावर पडलेल्या दरोड्याचा पुणे शहर पोलीसांकडून उलगडा
Jwellers Robbery Case: म्हणून मालक चोरांच्या मागे पळाला नाही; धायरी येथे भरदिवसा सोनाराच्या दुकानावर पडलेल्या दरोड्याचा पुणे शहर पोलीसांकडून उलगडा
धायरी: येथील रायकरमळा परिसरातील श्री ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर भरदिवसा पडलेल्या दरोड्याचा पुणे शहर पोलीसांच्या गुन्हे शाखा दरोडा व वाहनचोरी प्रतिबंधक पथक क्र 2 व नांदेड सिटी पोलीसांनी छडा लावला आहे. पोलीसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली असून शेअरमार्केटमध्ये बुडालेले पैसे आणि वाढलेल्या कर्जामुळे मालक विष्णू सखाराम दहिवाळ यानेच हा दरोड्याचा बनाव रचल्याचे उघड झाले आहे.
दि 15 एप्रिल रोजी भरदिवसा धायरी येथील रायकरमळा परिसरातील श्री ज्वेलर्सवर दरोडा पडल्याने खळबळ उडाली होती. मालक विष्णू दहिवाळ याने तीन अज्ञात दरोडेखोरांच्या विरोधात 22 तोळे सोन्याचे दागिने शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याबाबत नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता व भरदिवसा हा प्रकार घडल्याने पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी याची गंभीर दखल घेऊन तातडीने तपास करण्याच्या सूचना गुन्हे शाखा व नांदेड सिटी पोलीसांना दिल्या होत्या.
गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहनचोरी प्रतिबंधक पथक क्र 2 च्या अधिकारी व कर्मचारी यांनी शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे पडताळून आरोपी दिलीप सुभाष मंडलीक (वय 32, रा दिघी) याला ताब्यात घेतले व मुद्देमाल जप्त केला असता ते दागिने खोटे असल्याचे व दुकानाचा मालक विष्णू दहिवाळ यानेच दोन लाखांच्या मोबदल्यात हा दरोडा टाकण्यास सांगितल्याचा जबाब दिला. त्यानंतर इतर दोन आरोपी राजू चांगदेव गालफाडे (वय 40, रा लांडेवाडी झोपडपट्टी,भोसरी) व शाम शेषराव शिंदे (वय 37, रा लांडेवाडी झोपडपट्टी, भोसरी) यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपी दिलीप सुभाष मंडलिक याने दिलेल्या जबाबानुसार मालक विष्णू सखाराम दहिवाळ याला नांदेड सिटी पोलीसांनी ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता शेअर मार्केटमध्ये बुडालेले पैसे व दुकानात झालेल्या तोट्यामुळे आपणच हा दरोड्याचा बनाव रचल्याची कबुली त्याने दिली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे, झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, दरोडा व वाहनचोरी प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिपान पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक छबु बेरड , राहुल यादव, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पोलीस अंमलदार प्रशांत काकडे, सुनिल चिखले, नवनाथ वणवे, शिवाजी क्षीरसागर, स्वप्निल मगर, किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे, मोहन मिसाळ, निलेश कुलथे, भिमराज गांगुर्डे, उत्तम शिंदे, विजय विरणक, प्रथमेश गुरव, अक्षय जाधव, रोशन मंडले यांनी हा गुन्हा उघडकीस आणण्यात महत्वाची भूमिका बजावली. पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
तो संशय खरा ठरला!
तीघेही चोर बॅग घेऊन सहज पळून गेलेले शेजारील दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसत होते. एवढी मोठी घटना घडली मग मालक आरडाओरडा करत चोरांच्या मागे प्रतिकार करत किंवा आरडाओरडा करत लगेच पळाला का नाही अशी शंका व्हिडिओ पाहून नागरिक उपस्थित करत होते. पोलीसांनाही मालक विष्णू दहिवाळ याच्यावर संशय होता. तपासातून हा बनाव त्यानेच रचलेला असल्याने त्याने प्रतिकार केला नसल्याचे स्पष्ट झाले व सर्वांचा संशय खरा ठरला.
नातेवाईकाच्या मदतीने रचला कट
मालक विष्णू दहिवाळ याने नातेवाईक दिलीप सुभाष मंडलिक याच्या मदतीने दरोड्याच्या बनावाचा कट रचला. विष्णू दहिवाळ याने दिलीप मंडलिक याला दोन लाख रुपयांना हे काम ठरविले होते त्यासाठी दहा हजार रुपये ॲडव्हान्स देण्यात आले होते. पोलीस तपासात या बनावाचा पर्दाफाश झाला.