
Traffic Issue:किरकटवाडी फाटा येथे वाहतूक कोंडी; Happy Thoughts च्या कार्यक्रमामुळे वाहनांच्या रांगा; नेहमीच्या त्रासाने नागरिक हैराण
Traffic Issue:किरकटवाडी फाटा येथे वाहतूक कोंडी; Happy Thoughts च्या कार्यक्रमामुळे वाहनांच्या रांगा; नेहमीच्या त्रासाने नागरिक हैराण
किरकटवाडी: Happy Thoughts अर्थात मनन आश्रम येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामुळे किरकटवाडी फाटा येथे वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. रविवार असल्याने पर्यटकांची वाहने आणि या तथाकथित आश्रमाकडून येणारी वाहने यामुळे किरकटवाडी फाटा येथे वाहतूक कोंडी झाली आहे. या ठिकाणी सतत होत असलेल्या कार्यक्रमांमुळे स्थानिकांना मात्र नेहमीच मनःस्ताप सहन करावा लागत आहे.
सणसनगर येथे या तथाकथित आश्रमात ऐन सुट्टीच्या दिवशी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जाहिरातबाजी करून कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामुळे लाखो लोक या कार्यक्रमासाठी येतात. या कार्यक्रमाची सुटण्याची वेळ आणि मुख्य सिंहगड रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढण्याची वेळ एकच असते. परिणामी नांदोशी बाजूकडून या कार्यक्रमावरुन येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. संबंधित व्यवस्थापनाकडून वाहतूक नियोजनासाठी कर्मचारी किंवा स्वयंसेवक ठेवले जातात ते त्यांच्याच वाहनांना अगोदर सोडतात. त्यामुळे मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगा लागतात.
स्थानिक नागरिक, पर्यटक व इतर सर्वांना या आश्रमाच्या वाहनांमुळे सातत्याने त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज देण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या आश्रमाला दिलेल्या बांधकाम परवानग्या रद्द केलेल्या आहेत. तरिही या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. नांदेड सिटी पोलीस व नांदेड सिटी वाहतूक विभाग यांनी याबाबत दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे.