
Crime News:किरकटवाडी फाटा येथे आढळला जखमा असलेला मृतदेह; नांदेड सिटी पोलीस घटनास्थळी दाखल
Crime News:किरकटवाडी फाटा येथे आढळला जखमा असलेला मृतदेह; नांदेड सिटी पोलीस घटनास्थळी दाखल
किरकटवाडी: सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी फाटा येथून काही अंतरावर स्वागत हॉटेल समोर गटाराच्या नालीत तरुणाचा जखमा असलेला मृतदेह आढळला आहे. देवानंद सुरेश मारगुती (वय 25 रा. लक्ष्मीनगर, किरकटवाडी) असे मृत तरुणाचे नाव आहे. नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस,इतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
आज सकाळी स्वागत हॉटेल समोर गटारामध्ये मृतदेह असल्याची माहिती काही नागरिकांनी नांदेड सिटी पोलीसांना दिल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह गटाराच्या पाण्याबाहेर काढून पाहणी केली असता हातावर, डोक्यावर जखमा असून त्यातून रक्तस्राव झाल्याचे दिसून येत आहे. तसेच डोक्याचा भाग दबल्याने तिरपा झालेला दिसत आहे. सर्व शक्यता लक्षात घेऊन तपास सुरू करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे.
अपघात की घातपात?
मृत व्यक्तीच्या खिशात दारुची बाटली सापडली असून त्याला दारुचे व्यसन होते. काल सायंकाळी पाच वाजल्यापासून तो घरातून गेला होता. घरचे शोध घेत होते परंतु तो मिळून आला नाही. आज त्याचा जखमा असलेला मृतदेह आढळला आहे. मृतदेहाची स्थिती पाहता प्रथमदर्शनी त्याचा अपघात झाला असल्याचे व डोक्यावरुन चाक गेले असल्याचे दिसून येत आहे. तसेच अपघात झाल्यानंतर संबंधित वाहनचालकाने त्याला गटारात फेकून दिले असल्याचे दिसून येत आहे. मात्र याबाबत खात्रीलायक माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस तपास करत असून लवकरच हा अपघात की घातपात याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
पालिकेचे सीसीटीव्ही बंद!
दरम्यान किरकटवाडी,फाटा, किरकटवाडी स्मशानभूमी व मुख्य सिंहगड रस्त्यावरील पालिकेचे सर्व सीसीटीव्ही बंद आहेत. नागरिकांनी वारंवार मागणी करूनही पालिकेचे अधिकारी लक्ष देत नाहीत. परिणामी अशा घटना घडल्यानंतर तपास करताना अडथळे निर्माण होत आहेत. दरम्यान नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी 100 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे पत्र पालिकेला दिलेले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी दिली आहे. याबाबत पालिकेने लवकर कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.