
Fund Scam: नवीन जलवाहिनीची एकाच जागी दोनदा दुरुस्ती तरिही गळती थांबेना; पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे नांदोशी-सणसनगरला अपुरा पाणीपुरवठा
Fund Scam: नवीन जलवाहिनीची एकाच जागी दोनदा दुरुस्ती तरिही गळती थांबेना; पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे नांदोशी-सणसनगरला अपुरा पाणीपुरवठा
पुणे: महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अनागोंदी कारभाराचा फटका सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील नांदोशी, सणसनगर व वांजळवाडी या गावांतील नागरिकांना बसत आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी लाखो रुपये खर्च करून नव्याने टाकण्यात आलेली जलवाहिनी किरकटवाडी-नांदोशी रस्त्यालगत एकाच ठिकाणी दोन तीनदा फुटली आहे. अगोदरच दोन दिवसांआड पाणीपुरवठा होणाऱ्या या गावांमध्ये पाणी गळतीमुळे अपुरा पाणीपुरवठा होत आहे.
काही दिवसांपूर्वी आपत्कालीन उपाययोजना म्हणून नांदोशी सणसनगर या गावांसाठी असलेली जलवाहिनी जागोजागी नव्याने टाकण्यात आली. आयुक्तांच्या आदेशानुसार अत्यंत वेगाने हे काम करुन घेण्यात आले व कदाचित त्याच घाईने संबंधित ठेकेदाराचे बीलही अदा करण्यात आले असेल मात्र ही नव्याने टाकण्यात आलेली जलवाहिनी सातत्याने एकाच जागी फुटुन लाखो लीटर पाणी वाया जात आहे.
जलवाहिनी टाकण्यासाठी लाखो रुपये खर्च झालेला असताना आता दुरुस्तीसाठी उधळपट्टी सुरू आहे. “खोदकाम, नवीन ज्वॉईंट, पुन्हा बुजविणे आणि पुन्हा गळती ….. पुन्हा खोदकाम, नवीन ज्वॉईंट, पुन्हा बुजविणे” असा खेळ सध्या पाणीपुरवठा विभागाकडून सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाने नांदोशी सणसनगरसाठी केलेल्या कामांची चौकशी होणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा विभागाचे काम नागरिकांच्या सोयीसाठी सुरू आहे की ठेकेदाराचे खिसे भरण्यासाठी अशी शंका उपस्थित केली जात आहे. याबाबत दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येत आहे.