
छेडछाड करुन सातत्याने त्रास देणाऱ्या विरोधात महिलेची तक्रार; नांदेड सिटी पोलीसांनी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केल्यानंतर चोवीस तासांच्या आत आरोपीस अटक करुन दोषारोपपत्रही न्यायालयात केले सादर
छेडछाड करुन सातत्याने त्रास देणाऱ्या विरोधात महिलेची तक्रार; नांदेड सिटी पोलीसांनी गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केल्यानंतर चोवीस तासांच्या आत आरोपीस अटक करुन दोषारोपपत्रही न्यायालयात केले सादर
पुणे: तक्रार करायला गेल्यानंतर पोलीसांनी तक्रार ऐकून सुद्धा घेतली नाही, खुप वेळ बसून राहिलो तरी तक्रार दाखल करुन घेतली नाही, उडवाउडवीची उत्तरे देऊन तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली, अरेरावीची किंवा उद्धट भाषा वापरून तक्रारदारालाच दमदाटी केली वगैरे वगैरे अशा अनेक नकारात्मक बातम्या पोलीसांवाविषयी दररोज कुठे ना कुठे वाचायला मिळतात मात्र नव्याने सुरू झालेल्या पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील नांदेड सिटी पोलीसांच्या तत्परतेमुळे महिला अत्याचारांच्या तक्रारीबाबत कशी कार्यवाही केली पाहिजे याचा वस्तुपाठ निर्माण झाला आहे.
एक व्यक्ती सातत्याने जाणीवपूर्वक त्रास देत असल्याबाबत, बदनामी करत असल्याबाबत व इतर बाबत महिलेने नांदेड सिटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी पुढील गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम 74,78,115(1),351(2),352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक स्वप्नाली गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चिखले, पोलीस कॉन्स्टेबल सुर्यवंशी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात केली. आरोपी जोएल पॉल्स (वय 26, रा. शिवणे,पुणे) याला चोवीस तासांच्या आत अटक करुन वेगाने तपास करुन तातडीने दोषारोपपत्र तयार केले. महात्वाचे म्हणजे आरोपी व दोषारोपपत्र मा. न्यायालयापुढे सादर करत पोलीस प्रशासनाची तत्परता व संवेदनशीलता दाखवून दिली आहे. महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना रोखण्यासाठी सर्वच पोलीस स्टेशनकडून अशाप्रकारे तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.