
नांदेड फाट्याजवळील पुलाला भाजी विक्रेत्यांचा विळखा तर भाजी खरेदी करणारे मोबाईल चोरांच्या विळख्यात;पालिका आणि पोलीसांनी कारवाई करण्याची मागणी
नांदेड फाट्याजवळील पुलाला भाजी विक्रेत्यांचा विळखा तर भाजी खरेदी करणारे मोबाईल चोरांच्या विळख्यात;पालिका आणि पोलीसांनी कारवाई करण्याची मागणी
सिंहगड रोड: नांदेड फाट्याजवळील पुलाला मागील काही दिवसांपासून भाजी विक्रेत्यांनी विळखा घातल्याने वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे तर दुसऱ्या बाजूला जे नागरिक या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी थांबत आहेत त्यांचे मोबाईल काही क्षणांत लंपास केले जात आहेत. त्यामुळे या भाजी विक्रेत्यांवर पालिकेच्या संबंधित विभागाने कारवाई करावी व नांदेड सिटी पोलीसांनी मोबाईल चोरांच्या मुसक्या आवळाव्यात अशी मागणी नागरिक करत आहेत.
नांदेड फाट्याजवळील पुलावर सायंकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते गर्दी करुन थांबत आहेत. अगोदरच हा पूल अरुंद असून सायंकाळी वाहनांची संख्या जास्त प्रमाणात असते. अशावेळी या भाजी विक्रेत्यांमुळे व रस्त्यावर मधेच गाडी थांबवून भाजी खरेदी करणाऱ्या नागरिकांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.
दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पाळत ठेवून मोबाईल चोरणारी टोळी सक्रिय आहे. मागील काही दिवसांपासून या ठिकाणी अनेक महागडे मोबाईल चोरीला गेले आहेत. ग्राहक भाजी खरेदी करत असताना अत्यंत हातसफाईने मोबाईल लंपास करुन काही क्षणांत स्विच ऑफ केले जात आहेत. मोबाईल चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असल्याने नांदेड सिटी पोलीसांनी सापळा रचून ही टोळी जेरबंद करण्याची मागणी नागरिक करत आहेत. तसेच मुख्य म्हणजे वाहतूक कोंडी व मोबाईल चोरीचे मुळ असणारी ही अघोषित भाजी मंडई पालिकेच्या संबंधित विभागाने बंद करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.