
जे.पी.नगर वसाहतीतील शौचालयाची दुरवस्था; उपाययोजना न केल्यास सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात शौचाला बसून आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा
जे.पी.नगर वसाहतीतील शौचालयाची दुरवस्था; उपाययोजना न केल्यास सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात शौचाला बसून आंदोलन करण्याचा नागरिकांचा इशारा
पुणे: सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या नांदेड गावच्या हद्दीतील जयप्रकाश नारायण नगर येथील सार्वजनिक शौचालयाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. वारंवार तक्रारी करुनही पालिकेकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने आता कार्यवाही न झाल्यास सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात शौचाला बसून आंदोलन केले जाईल असे निवेदन रहिवासी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी हनुमंत शिवूर यांनी दिले आहे.
जेपी नगर येथील सार्वजनिक शौचालयात अस्वच्छता आहे. शौचालये तुंबलेली आहेत. कायमस्वरूपी पाण्याची सोय नाही. संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरलेली असल्याने नागरिकांच्या आरोग्याची समस्या गंभीर बनली आहे.त्यामुळे तातडीने दखल घेऊन शौचालयाची स्वच्छता करण्यात यावी व कायमस्वरूपी पाण्याची सोय करण्यात यावी अन्यथा सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात शौचाला बसून आंदोलन केले जाईल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान जयप्रकाश नारायण नगर येथे मोठी लोकवस्ती आहे. येथील बहुतांश रहिवासी हे सार्वजनिक शौचालयावर अवलंबून आहेत. या शौचालयात नेहमीच अस्वच्छता असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. ‘ द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने याबाबत सातत्याने आवाज उठवून पालिका प्रशासनाचे लक्ष वेधलेले आहे मात्र तात्पुरती मलमपट्टी केली जाते. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देवून कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे.