
सिंहगड रस्त्यावर नांदेड सिटी पोलीसांची नाकाबंदी; पोलीस निरीक्षक कारवाईसाठी रस्त्यावर; अनेक तळीरामांवर कारवाई
सिंहगड रस्त्यावर नांदेड सिटी पोलीसांची नाकाबंदी; पोलीस निरीक्षक कारवाईसाठी रस्त्यावर; अनेक तळीरामांवर कारवाई
सिंहगड रोड: सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळील दळवीवाडी येथे नांदेड सिटी पोलीसांनी कडक नाकाबंदी लावल्याने अनेक तळीराम या कारवाईच्या तडाख्यात सापडल्याचे दिसून आले. या कारवाईसाठी दोन पोलीस अधिकारी व पंधरा पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते व नांदेड सिटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस हे स्वतः या कारवाईसाठी रस्त्यावर उतरले होते.
कायदा सुव्यवस्था राखण्याच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेश पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहर हद्दीतील सर्व पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. त्यानुसार नांदेड सिटी पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळील कालव्यालगत नाकाबंदी लावली होती.
शनिवार असल्याने सिंहगड, पानशेत भागातील हॉटेल, फार्महाऊस वरुन पार्टी करुन आलेले अनेक तळीराम या नाकाबंदीत सापडलेले दिसून आले. चारचाकी,दुचाकी चालकांची या नाकाबंदी दरम्यान तपासणी करण्यात येत होती. मागील काही दिवसांपासून सातत्याने नाकाबंदी करण्यात येत असल्याने सर्वसामान्य नागरिक कारवाईचे कौतुक करताना दिसत आहेत तर ‘रात्रीस खेळ करणारांनी’ मात्र या कारवाईचा चांगलाच धसका घेतला आहे.