
गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगाराला अटक; नांदेड सिटी पोलीसांची कारवाई
गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगाराला अटक; नांदेड सिटी पोलीसांची कारवाई
सिंहगड रोड: गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसांसह सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात नांदेड सिटी पोलीसांना यश आले आहे. प्रज्वल भास्कर थोरात (वय 21, रा. मानाजी नगर, नऱ्हे पारी कंपनी रोड,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर बेकायदा शस्त्र बाळगणे, मारामारी असे तीन गुन्हे यापूर्वी दाखल आहेत.
नव्याने सुरू झालेल्या नांदेड सिटी पोलीस स्टेशन च्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून हद्दीत झाडाझडती सुरू आहे. सराईत गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यात येत असून पोलिस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांच्या निर्देशांनुसार प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात येत आहेत. त्यानुसार हद्दीत गस्त घालत असताना तपास पथकातील कॉन्स्टेबल शिवाजी क्षिरसागर व स्वप्नील मगर यांना सराईत गुन्हेगार प्रज्वल थोरात याच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून मिळाली. माहितीची खातरजमा करून वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी तातडीने तपास पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सापळा रचून आरोपीला जेरबंद करण्यात आले आहे.
पश्चिम प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सिंहगड रोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, पोलीस निरीक्षक गुन्हे गुरुदत्त मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे, पोलीस अंमलदार प्रशांत काकडे, शिवाजी क्षीरसागर, स्वप्नील मगर, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.