
नांदेड सिटी पोलीस स्टेशन कडून अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका मात्र अजूनही काहींचा लपाछपीचा खेळ सुरू
नांदेड सिटी पोलीस स्टेशन कडून अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका मात्र अजूनही काहींचा लपाछपीचा खेळ सुरू
सिंहगड रोड: नव्याने नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या नांदेड, खडकवासला, किरकटवाडी, नांदोशी सणसनगर व धायरी परिसरामध्ये गावठी दारू, ताडी, गांजा, गुटखा व जुगार मटका असे अवैध धंदे बंद करण्यासाठी नांदेड सिटी पोलीसांनी कारवाईचा धडाका लावला असून अवैध धंद्यांची अनेक ठिकाणं उध्वस्त करण्यात आली आहेत. मात्र अजूनही काही धंदे चोरुन लपून किंवा ‘गुडलक’ देऊन सुरु असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.
अवैध धंद्यांमुळे खडकवासला, किरकटवाडी, नांदेड या भागात अल्पवयीन गुन्हेगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. ही गावे हवेली पोलीस स्टेशन हद्दीत असताना अवैध धंदेवाले ‘डायवर ला जीव लावत होते’, परिणामी राजरोसपणे सर्व अवैध धंदे सुरू होते. अवैध धंदेवाल्यांच्या इशाऱ्यावर पोलीसांचा कारभार सुरू असल्याचे विदारक चित्र दिसून येत होते. अवैध धंदे वाल्यांना पायघड्या घातल्या जात होत्या तर चोरीची तक्रार दाखल करुन घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना सहा-सहा महिने हवेली पोलीस ठाण्याचे उंबरे झिजवावे लागत होते.
दरम्यान काही दिवसांपूर्वी ही गावे पुणे शहर आयुक्तालयातील नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत समाविष्ट करण्यात आल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. नांदेड सिटी पोलीसांनीही गावे हद्दीत आल्यापासून अवैध धंद्यांवर धडक कारवाई सुरू केली आहे व अशा परिसरात गस्त वाढवून कर्मचारी तैनात केले आहेत. नांदेड सिटी पोलीस स्टेशन मधील काही पोलीस मात्र ‘गुडलक’ च्या मोहापायी ‘लपून आणि जपून’ चा कानमंत्र देऊन धंदे सुरू ठेवण्यास पाठींबा देत आहेत का अशी शंका सुरू असलेल्या धंद्यांमुळे उपस्थित होत आहे. पोलीस निरीक्षक अतुल भोस यांनी मात्र अवैध धंद्यांच्या विरोधात कोणतीही कसर न ठेवता कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे व पुढेही करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.