
संपादकीय:जनरल ‘कायर’ आणि विकली गेलेली मुर्दाड व्यवस्था!
जनरल ‘कायर’ आणि विकली गेलेली मुर्दाड व्यवस्था!
(संपादकीय)
13 एप्रिल 1919 हा दिवस भारतीय स्वातंत्र्य पूर्व इतिहासात काळा दिवस म्हणून ओळखला जातो. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी क्रुरकर्मा जनरल डायर याच्या आदेशाने शांततेच्या मार्गाने पंजाब प्रांतातील अमृतसर येथील जालियनवाला बाग येथे सभेसाठी जमलेल्या जमावावर बेछूट गोळीबार करण्यात आला ज्यात चारशे पेक्षा जास्त निष्पाप नागरिकांचा बळी गेला, ज्यात लहान मुले आणि महिलांचाही समावेश होता. ‘रौलेट ॲक्ट’ चा विरोध करण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती जी डायरने अत्यंत क्रूर पद्धतीने मोडून काढली. रौलेट कायदा म्हणजे एक प्रकारची मनमानी होती. या कायद्यानुसार ब्रिटीश कोणत्याही भारतीयाला अनिश्चित काळासाठी अटक करु शकत होते, ज्याला भारतीयांचा विरोध होता परंतु तो विरोध अत्यंत निर्दयीपणे चिरडण्यात आला.
जनरल डायरला ‘कायर’ म्हणणं अधिक समर्पक ठरेल! आणि असे ‘डायर’ म्हणजेच कायर आजही प्रशासनात आहेत आणि आपली मनमानी चालविण्यासाठी ते सर्वसामान्य निष्पाप नागरिकांना आपल्या पदाचा,अधिकारांचा गैरवापर करून अक्षरशः संपविण्याचा प्रयत्न करत आहेत. धक्कादायक म्हणजे अशा जनरल कायरांना व्यवस्था पाठीशी घालत आहे हे दुर्दैव.
एक पोलीस निरीक्षक अर्थात ‘जनरल कायर’ सामान्य नागरिकांचे प्रश्न, व्यथा मांडून अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पत्रकाराचा विरोध मोडून काढण्यासाठी कटकारस्थान करतो. अवैध धंदेवाल्यांची ढाल करुन त्यांच्या आडून कुरापती करतो. आपण बरबटलेले असताना स्वच्छ आहोत अशी कागदं रंगविण्यासाठी दबाव टाकून खोटे जबाब लिहून घेतो. खोटे गुन्हे दाखल करण्यासाठी अटोकाट प्रयत्न करतो. त्याच्या विरोधात तक्रारी गेल्या की काही भ्रष्ट वरिष्ठांकडून पैशांच्या जोरावर विरोधाची धार कमी करुन घेतो. एका सामान्य माणसाला संपविण्यासाठी जे नाही ते करतो पण ‘सत्य’ त्याला लपविता येत नाही.
इतिहासातला जनरल डायर आणि हा वर्तमानातला ‘जनरल कायर’ यांच्यात खूप साम्य आहे. दोघांचा हेतू एकच विरोध मोडून काढणे. जनरल डायर च्या कृत्याची काही ब्रिटीश अधिकाऱ्यांनी पाठराखण केली होती. त्याचे समर्थन करण्यात येत होते. येथील मुर्दाड व्यवस्था ही बरेवाईट समजू शकली नाही. या ‘जनरल कायर’चीही वरिष्ठांनी पाठराखण केली. आपण स्वच्छ आहोत हे दाखविण्यासाठी ‘जनरल कायर’ भलेही व्यवस्थेला विकत घेऊ शकला असेल परंतु त्याच्या मनात त्याची प्रतिमा नीच असणार यात मात्र शंका नाही!