
मुख्य वीज वाहिनी तुटली; किरकटवाडीच्या अर्ध्या भागासह नांदोशी-सणसनगर चा वीजपुरवठा खंडित;ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची अरेरावी
मुख्य वीज वाहिनी तुटली; किरकटवाडीच्या अर्ध्या भागासह नांदोशी-सणसनगर चा वीजपुरवठा खंडित;ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांची अरेरावी
किरकटवाडी: येथील माळवाडी येथे नांदोशी- किरकटवाडी रस्त्यालगत ड्रेनेज लाईनचे काम सुरू असताना पोकलेनचा धक्का लागल्याने मुख्य वीज वाहिनी तुटली आहे. परिणामी किरकटवाडीच्या अर्ध्या भागासह नांदोशी-सणसनगर या गावांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. दरम्यान तपासणीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांशी संबंधित ठेकेदाराचे कर्मचारी अरेरावी करत आहेत.
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेला नांदोशी-किरकटवाडी रस्ता ड्रेनेज लाईनचे काम करण्यासाठी तोडण्यात येत असल्याने अगोदरच संतप्त झालेल्या नागरिकांना या कामामुळे वीज वाहिनी तुटल्याने आणखी मनस्ताप सहन करावा लागत आहे. वीज वाहिनी तुटल्यानंतर ती दुरुस्त करून देण्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते मात्र आता आम्ही काहीच करणार नाही सकाळी पाहू म्हणून ठेकेदाराचे कामगार अरेरावी करत आहेत.
दरम्यान पालिकेचे संबंधित अधिकारीही फोन उचलत नसल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर महावितरणने केबल दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत मात्र सकाळपर्यंत हे दुरुस्तीचे काम चालणार असल्याने सकाळीच वीजपुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात येत आहे.