
अखेर अधिसूचना आली; हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील त्या गावांचा नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत समावेश; अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले
अखेर अधिसूचना आली; हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील त्या गावांचा नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत समावेश; अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले
पुणे: पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नांदेड, किरकटवाडी, खडकवासला, नांदोशी व सणसनगर या गावांची पूर्ण महसुली हद्द अखेर पुणे शहर पोलीस आयुक्तालयांतर्गत नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहे. त्याबाबतची अंतिम अधिसूचना आज प्रसिद्ध करण्यात आली असून त्यामुळे हवेली पोलीसांच्या आशिर्वादाने राजरोसपणे सुरू असलेल्या अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणाणले आहेत. दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिक या गावांचा शहर हद्दीत समावेश करण्यात आल्याने समाधान व्यक्त करत आहेत.
काही दिवसांपूर्वी नांदेड सिटी येथे नवीन पोलीस स्टेशन सुरु करण्यात आले होते मात्र अंतिम अधिसूचना नसल्याने नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या गावांची हद्द या पोलिस स्टेशन हद्दीत आलेली नव्हती. दरम्यान या गावांमध्ये चोऱ्या, घरफोड्या, गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. हवेली पोलीसांच्या आशिर्वादाने राजरोसपणे या भागात अवैध धंदे सुरू होते. त्यामुळे नागरिक लवकरात लवकर या गावांचा पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समावेश करण्यात यावा अशी मागणी करत होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही काही दिवसांपूर्वी ट्विट करुन ही मागणी केली होती.

अखेर आज याबाबत अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून नांदेड, किरकटवाडी, खडकवासला नांदोशी व सणसनगर या गावांची पूर्ण महसुली हद्द नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीत समाविष्ट करण्यात आली आहे. या आदेशाची उद्यापासूनच अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.