
चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला! टेमघर धरण दुरुस्तीसाठी अजून तब्बल 315 कोटी निधी मंजूर; बांधणी पेक्षा दुरुस्तीसाठी दीडपट जास्त निधी
चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला! टेमघर धरण दुरुस्तीसाठी अजून तब्बल 315 कोटी निधी मंजूर; बांधणी पेक्षा दुरुस्तीसाठी दीडपट जास्त निधी
पुणे: खडकवासला धरण साखळीला जोडणाऱ्या मुळशी तालुक्यातील बहुचर्चित टेमघर धरण दुरुस्तीसाठी काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तब्बल 315.5 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आल्याने ‘ चार आण्याची कोंबडी अन् बारा आण्याचा मसाला ‘ या म्हणीचा प्रत्यय येत आहे. यापूर्वी या धरणाच्या दुरुस्तीसाठी 100 कोटींपेक्षा जास्त निधी खर्च करण्यात आलेला आहे.
सुमारे 314 कोटी रुपये खर्च करून 2000 साली टेमघर धरण बांधून पूर्ण झाले होते. धरण भरल्यानंतर या धरणाच्या भिंतीतून निकृष्ट कामामुळे मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याचे दिसून आले. त्यावेळी याबाबत मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. नवीन धरणाची दुरुस्ती करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली होती. आतापर्यंत तब्बल 100 कोटींपेक्षा जास्त निधी या धरणाच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आला आहे मात्र गळती थांबलेली नाही.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी आणखी 315 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. अगोदरचे 100 कोटी आणि आताचे 315 कोटी असा दोन्ही मिळून 415 कोटी रुपये खर्च दुरुस्तीवर होणार आहे. 314 कोटी निधीमध्ये पूर्ण धरण बांधून झाले होते. त्यामुळे बांधणीपेक्षा दुरुस्तीवर अधिक खर्च होत असल्याचे दिसत आहे.
गळती धरणाला की निधीला?
टेमघर धरण बांधणी ते दुरुस्ती दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. धरणातून पाण्याची आणि निधीची गळती काही केल्या थांबायचं नाव घेत नाही. याबाबत शासनाने गांभीर्याने चौकशी करुन कारवाई करण्याऐवजी कोटींमध्ये निधीची खैरात करण्यात येत आहे. त्यामुळे या गळतीला सर्वांचेच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समर्थन असल्याचे दिसत आहे.