
IMPACT: नांदेड फाट्याजवळील विहिर परिसरात सीसीटीव्ही बसविले; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या दुसऱ्या मागणीचीही पालिकेकडून दखल; लवकरच सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती होणार
IMPACT: नांदेड फाट्याजवळील विहिर परिसरात सीसीटीव्ही बसविले; द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’च्या दुसऱ्या मागणीचीही पालिकेकडून दखल; लवकरच सुरक्षा रक्षकांचीही नियुक्ती होणार
सिंहगड रोड: सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळील पाणीपुरवठा विहिरीला लोखंडी जाळी बसवून घेतल्यानंतर आता पालिकेने विहिरीच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. सध्या पालिकेच्या नियमीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी पाळ्या लावण्यात आल्या असून लवकरच सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने लक्ष वेधल्यानंतर पालिका प्रशासनाकडून तातडीने दखल घेऊन कार्यवाही करण्यात आली आहे.

नांदेड, किरकटवाडी, डीएसके विश्व, नांदोशी, सणसनगर येथील लाखो नागरिकांना नांदेड फाटा येथील विहिरीतून पाणीपुरवठा केला जातो. सुमारे महिनाभरापूर्वी या गावांमध्ये अचानक जुलाब उलट्यांची साथ पसरली होती. यातील अनेक रुग्णांना गुइलेन बॅरे सिंड्रोम (GBS) हा आजार झाल्याचे उपचारांदरम्यान निदान झाले. यातील काही रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तर काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान दुषित पाण्यामुळे हा आजार पसरल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे. त्यामुळे नांदेड फाटा येथील विहिरीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने पालिका आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. व संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून विहिरीच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा जाळी, सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे व सुरक्षा रक्षक तैनात करण्याकडे लक्ष वेधून सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार पालिकेने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने आवश्यक कार्यवाही केली आहे. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने हे विषय लावून धरल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.