ना सीसीटीव्ही, ना सुरक्षा जाळी ना सुरक्षारक्षक;लाखोंना पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरी बेवारस स्थितीत;पालिकेचा समाविष्ट गावांतील नागरिकांच्या जीवाशी खेळ
ना सीसीटीव्ही, ना सुरक्षा जाळी ना सुरक्षारक्षक;लाखोंना पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरी बेवारस स्थितीत;पालिकेचा समाविष्ट गावांतील नागरिकांच्या जीवाशी खेळ
(निलेश बोरुडे: संपादक -द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)
सिंहगड रोड: नांदेड, किरकटवाडी, नांदोशी-सणसनगर, डीएसके विश्व व धायरी भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरींची सुरक्षा रामभरोसे असल्याने पालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असे दिसून येत आहे. दोन्ही विहिरींना सुरक्षा जाळ्या बसविण्यात आलेल्या नाहीत, सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत तसेच निगराणीसाठी सुरक्षारक्षक सुद्धा तैनात करण्यात आलेला नाही. त्यामुळे इतका अक्षम्य हलगर्जीपणा का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळील विहिरीतून नांदेड, किरकटवाडी नांदोशी-सणसनगर व डीएसके विश्व च्या काही भागाला पाणीपुरवठा केला जातो. तर बारांगणी मळा येथील विहिरीतून धायरी व परिसराला पाणीपुरवठा केला जातो. या दोन्हीही विहीरींवर सुरक्षेच्या दृष्टीने काहीच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. लाखो लोक ज्या विहिरींचे पाणी पितात त्या विहिरींचेच आरोग्य धोक्यात आहे. कठड्यांची उंची कमी असल्याने सहज एखादा प्राणी, इतर घाण त्यात पडू शकते. तसेच जाणीवपूर्वक समाजकंटक पाण्यात काही घाण टाकून धोका निर्माण करु शकतात.
मागील काही दिवसांपासून या दोन विहिरींवरुन ज्या नांदेड, किरकटवाडी, नांदोशी-सणसनगर,डीएसके विश्व, धायरी या भागात पाणीपुरवठा केला जातो त्या भागात जुलाब, उलट्यांनी नागरिक बेजार झाले आहेत. तसेच गुइलेन बॅरे सिंड्रोम(GBS) हा दुर्मिळ आजार मोठ्या प्रमाणात पसरला आहे. या विहिरींच्या पाण्यातूनच ही रोगराई पसरली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसऱ्या बाजूला पाणी दुषित नसल्याचा दावा पालिका करत आहे. पालिकेने पाण्याची तपासणी आता केली आहे परंतु ही रोगराई मागील पंधरा ते वीस दिवसांपूर्वी पसरली आहे. यापुढे पालिकेने नागरिकांच्या आरोग्याशी न खेळता दोन्ही विहिरींना सुरक्षा जाळ्या बसवून घ्याव्यात, सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घ्यावेत व कायमस्वरूपी सुरक्षारक्षक तैनात करण्यात यावेत.
विहिरींचा परिसर अत्यंत खराब
दोन्ही विहिरींचा परिसर अत्यंत खराब आहे. बारांगणी मळा येथील विहीच्या आजूबाजूला ड्रेनेज सोडण्यात आले आहे. त्याची अत्यंत दुर्गंधी येत आहे. नांदेड फाट्याजवळ असलेल्या विहिच्या काही अंतरावरुन कालवा व पाइपलाइन गेलेली आहे. पाइपलाइन च्या खड्डयात सडलेला कचरा, गटाराचे डबके साचलेले आहे. दोन्ही ठिकाणी हे घाण पाणी जमीनीत मुरुन विहिरींमध्ये जात नसेल का? याचा विचार पालिकेने करावा. विहिरींचा परिसरही स्वच्छ राहिल याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ने या सर्व गोष्टी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्या कानावर घातल्या असून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.